एक पाऊल शेअर मार्केटकडे...

प्रस्तावना

 

शेअर बाजाराबाबत सर्वानांच प्रचंड कुतुहल पहायला मिळते. त्या कुतुहलातूनच शेअर बाजाराबाबत लोकांमध्ये अनेक समजगैरसमज निर्माण झाले आहेत. विशेषत: गैरसमजच अधिक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक उत्पन्‍नाची चांगली संधी अन् पर्याय असूनही शेअर बाजारापासून दूर राहतात. काही लोकांना वाटतं शेअर बाजार म्हणजे प्रचंड अनिश्‍चितता, काहींना वाटत शेअर बाजार म्हणजे किचकट आकडेमोड, त्याला तर अर्थशास्त्राचे ज्ञान असायला पाहिजे, मग आम्हाला अर्थशास्त्राचा फारसा गंध नाही म्हणजे आम्हाला शेअर बाजाराचं गणित नाही समजणार. पण हे सगळे निव्वळ गैरसमज आहेत.

शेअर बाजार म्हणजे संधीचा महासागर

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला गणित किंवा अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान असायलाच पाहिजे, असे काही नाही. आपण टी.व्ही., वृत्तपत्रे, इंटरनेट अशा विविध माध्यमातून शेअर बाजाराचे ज्ञान आत्मसात करू शकतो. काही टी.व्ही. चॅनेल्सवर तर 24 तास केवळ शेअर बाजाराशी संबंधित बातम्यांचेच प्रसारण केले जाते. शेअर बाजारातील घडामोडी आणि विविध कंपन्यांचे शेअर्स याबाबत  सतत विश्‍लेषण सुरू असते. त्यामुळे आपल्याला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे आपल्याला त्याची मनापासून आवड असणे. सध्याची नोकरी, धंदा सांभाळून जादा कमाई करण्याची इच्छा असणे. शेअर बाजार हा अर्थप्राप्‍तीचा महासागर आहे. विशेष म्हणजे इथे सगळे व्यवहार असतात अत्यंत पारदर्शी .

कमीत कमी गुंतवणूकीत ही  मिळवा नफा

शेअर बाजाराबाबत गैरसमजच अधिक असतात. त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे शेअर बाजार वधारला किंवा एखाद्या शेअरची किंमत वाढली तरच आपल्याला फायदा होतो. पण असं बिल्कुल नाही. शेअर बाजार कोसळला किंवा एखाद्या शेअरच्या किमंतीने आपटी खाल्‍ली तरी गुंतवणूकदारांना फायदा होवू शकतो. दुसरा सर्वात मह्तवाचा गैरसमज असा असतो की, शेअर बाजारात गुंतवणूक करायची म्हटलं तर आपल्याजवळ खूप पैसे पाहिजेत. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे लाखो किंवा करोडो रूपये असायला पाहिजेत, अस नाही. आपल्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे पैसेदेखील आपण गुंतवू शकतो. जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराकडे दोन हजार रूपये असतील तर तो गुंतवणूकदार दोन हजार रूपये गुंतवून त्यातून नफा कमवू शकतो. कारण आपण ज्या कंपनीच्या माध्यमातून ट्रेडिंग करतो, ती कंपनी आपल्याला काही रक्‍कम ट्रेडिंगसाठी पुरविते. ही रक्‍कम आपल्याकडे असलेल्या रक्‍कमेच्या काही पटीत असते. त्याला ट्रेडिंगच्या भाषेत ‘मार्जीन मनी’ असे म्हणतात. अशा ‘मार्जीन मनी’चा वापर करून आपण दररोज थोडाथोडा फायदा  मिळवू शकतो.

घरबसल्या करा ट्रेडिंग

विशेष म्हणजे आपल्याला शेअर बाजारात  ट्रेडिंग करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घरबसल्या ट्रेडिंग करू शकता. सध्या सर्व ब्रोकरेज कंपन्यांनी वेबसाईटस् ़(संकेतस्थळ) आणि अ‍ॅप काढले आहेत. अ‍ॅपच्या मदतीने आपण घरात बसून आरामात  ट्रेडिंग करू शकतो.  ट्रेडिंग करण्यासाठी खिशात खूप जास्त पैसा असण्यापेक्षा आत्मविश्‍वास आणि इच्छाशक्‍ती असणे जरूरीचे आहे. ट्रेडिंग करण्यासाठी आठ सोपे टप्पे आहेत. या आठ टप्प्यातून आपल्याला समजेल की शेअर बाजार म्हणजे नक्‍की काय आहे ते? डीमॅट म्हणजे काय?, ट्रेडिंग अकाऊंट कसे उघडायचे?, ट्रेडिंगचे एकूण कती प्रकार आहेत? ट्रेडिंग कसे करतात? फायद्याचं नेमकं गणित कसं आहे आणि त्यासाठी काय केले पाहिजे ? अशा सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवायची असतील तर त्यासाठी आवश्यक आहे गुंतवणूकदारांनी एक पाऊल टाकण्याची...

गुंतवणूकीचे मार्ग बदला... फायदा मिळवा

आपल्या सगळ्यांनाच भविष्याची चिंता असते. स्वत:वर किंवा आपल्या परिवारावर कुठलेही संकट येवू नये, यासाठी आपण नेहमी तत्पर असतो. पण तरीही संकट आले तर करायचं काय?, अचानक पैशांची गरज लागली तर कशी जुळवाजुळव करायची? मुलांचे शिक्षण, लग्‍न यासाठी पैशाची तजवीज कशी करायची? घरातील एखादा सदस्य आजारी पडला तर हजारोलाखो रूपयांचे बील भागवायचे कसे? अशावेळी सर्वात मोठी मदत होते ती आपल्याजवळील बचतीची. आपल्या उत्पन्‍नातून आपण थोडी थोडी रक्‍कम बचत खाते, डिपॉझीट किंवा सोने दागिणे अशा माध्यमातून केलेली बचत अडचणीच्यावेळी उपयोगी पडते. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण बँकेत ठेवलेल्या रकमेवर आपल्याला खूप मोठा परतावा मिळत नाही. फिक्स् डिपॉझिटवर जेवढे व्याज असते, तेवढेच आपल्याला मिळते. त्यातून आपल्या सर्व गरजा पूर्ण होतातच, असे नाही. त्यासाठी आपल्यला गुंतवणूकीचे मार्ग बदलावे लागतात. जेणेकरून वाढती महागाई किंवा आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला फार त्रास होणार नाही. त्यासाठीच गुंतवणूकीचे नवनवे मार्ग शोधावे लागतात. भविष्यात फायदा होईल, या अपेक्षेने आपण गुंतवणूक करत असतो. या गुंतवणूकीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. ते म्हणजे भौतिक गुंतवणूक आणि आर्थिक गुंतवणूक. 

 

News-In-Focus