‘एसआयपी’ करताना घ्यावयाची खबरदारी...

‘एसआयपी’ करताना घ्यावयाची खबरदारी

    ‘एसआयपी’ म्हणजे सिस्टेमेटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.  दर महिण्याला सातत्याने शेअर बाजारातील इक्‍विटी फंडमध्ये काही वर्षे केल्या जाणार्‍या गुंतवणुकीला  ‘एसआयपी’ म्हणतात. या गुंतवणूकीमध्ये बाजारातील तेजी आणि मंदीकडे दूर्लक्ष करून अखंडपणे गुंतवणूक केली जाते. या गुंतवणूकीतून दिर्घकालीन विचार केल्यास गुंतवणूकदाराला भरभक्‍कम परतावा मिळतो. ‘एसआयपी’मध्ये नेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) ला खूप महत्व असते. 
    ‘एसआयपी’ म्हणजे नेमके काय? हे आपण एका उदाहरणांतून समजून घेण्याचा प्रयत्न करू. जर समजा आपण दर  महिण्याला 20 हजार रूपयांची गुंतवणूक करत असू आणि  जर कुठल्या महिण्यात ‘एनएव्ही’ 20 रूपये प्रती युनिट झाला तर त्या महिण्यात आपल्याला आपल्या 20 हजार रूपयांच्या गुंतवणूकीवर 1000 युनिटस् मिळतील.परंतू जर समजा शेअर बाजार कोसळला तर ‘एनएव्ही’ घटून 16 रूपये प्रती युनिट  होईल. त्यावेळी आपल्याला 20 हजार रूपयांच्या गुंतवणूकीवर 1350 युनिटस् मिळतील. हेच  ‘एसआयपी’मधील गुंतवणूकीचे रहस्य आहे. बाजारातील मंदीच्या काळात आपल्या युनिटस्ची संख्या आपोआप वाढते. 
    मोठमोठ्या फंड हाऊसेस द्वारा बाजारातील जोखमीचा अभ्यास करून गुंतवणूकदारांसाठी  ‘एसआयपी’च्या नवनवीन योजना आणल्या आहेत. त्यामध्ये मिळणारा परतावा हा गुंतवणूकदाराच्या जोखीम पेलण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो.  ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक करण्यातील सर्वात मोठी अडचण ‘गुंतवणूक कोठे करू’ ही नसून  ‘ ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करू किंवा नको, याबाबतील ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम आहे. अनेक गुंतवणूकदार  ‘एसआयपी’मध्ये सातत्य ठेवत नाहीत. काही गुंतवणूकदार  ‘एसआयपी’मध्ये सातत्य ठेवतात, पण मंदीच्या काळात गुंतवणूकीपासून दूर पळतात.
    गुंतवणूकीची खरी संधी शेअर बाजार कोसळल्यानंतर किंवा मंदीच्या काळातच असते. शेअर बाजारातील मंदीच्या वेळी गुंतवणूक करावी आणि तेजीमध्ये नफा कमवावा, हा  ‘एसआयपी’मधून चांगला परतावा मिळविण्याचा साधासरळ आणि खात्रीशीर मार्ग आहे. शेअर बाजार कोसळल्यानंतर चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर अगदी स्वस्तात मिळतात. पण काही लोक शेअर बाजारात तेजी असताना चढ्या भावाने शेअर खरेदी करतात आणि शेअर बाजार कोसळल्यानंतर तोट्यामध्ये शेअर विकून टाकतात. असे गुंतवणूकदार पुन्हा शेअर मार्केटची पायरी चढताना कचरतात. आपल्या गुंतवणूकीवर चांगल्या परतावा मिळावा, अशी अपेक्षा असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी  ‘एसआयपी’ हा सर्वात चांगला मार्ग समजला जातो. अनेक गुतवणूकदार शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकीचे पर्याय शोधत असतात. शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना पुन्हा बाजारात तेजी आल्यानंतर चांगला परतावा मिळतो.
    गेल्या पाच वर्षात ‘एसआयपी’ गुंतणुकीसाठीच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा केल्याने आज लाखो लोक  ‘एसआयपी’कडे वळले आहेत. पूर्वी  ‘एसआयपी’ करण्यासाठी एक ते तीन वर्षाचे चेक एकदम सही करून ब्रोकर अथवा फंड कंपन्यांकडे द्यावे लागत होते. चेक संपल्यानंतर पुन्हा गुंतवणूकदाराला तशी प्रक्रिया राबवावी लागायची. पण आता त्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. आता गुंतवणूकदारांसाठी  ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘ईएसआय’ची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘ईएसआय’मुळे गुंतवणूकदाराच्या खात्यावरून आपोआप रक्‍कम कपात होते. आता ‘एसआयपी’ बंद करणे आणि पुन्हा सुरू करणे सहज होते. पण अगोदर बंद ‘एसआयपी’ पुन्हा सुरू करण्यासाठी कागदपत्रांचे जंजाळाची पूर्तता करावी लागत होती.‘एसआयपी’च्या माध्यमातून अखंडपणे, सतत काही वर्षे गुंतवणूक सुरू ठेवल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोच, पण त्यासाठी गुंतवणूकदाराकडे आर्थीक शिस्त आणि सहनशीलता या दोन गोष्टी असणे अत्यंत जरूरीचे आहे. 
(Published On 07/03/2020)

News-In-Focus