"एक्सिडेन्टल इन्वेस्टर"... डॅाली खन्ना 

"एक्सिडेन्टल इन्वेस्टर"... डॅाली खन्ना 

    भारतीय शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूकदारांत "डॅाली खन्ना" हे एक नाव. शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर पोर्टफोलीओ असलेल्या डॉली खन्ना यशस्वी इन्वेस्टर जरी असल्या तरी त्यांच्या यशाच्या मागे "ब्रेन" त्यांचे पती राजीव खन्ना यांचा आहे. राजीव खन्ना यांनी पत्नी डॉली खन्ना यांच्या मदतीने त्यांच्या नावावर गुंतवणूक करून खूप संपत्ती जमविली व यशस्वी गुंतवणूकदार या रुपाने समोर आले. राजीव खन्ना यांना गुंतवणुकीबाबत काहीही ज्ञान नव्हते ते अपघाताने शेअर मार्केटमध्ये आले म्हणूनच त्यांना "एक्सिडेन्टल इन्वेस्टर" असे म्हंटले जाते. 

    राजीव खन्ना यांचा जन्म चेन्नईतील एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये झाला. दलाल स्ट्रीटवरील यशस्वी इन्वेस्टर होईपर्यंत त्यांचा प्रवास खूप संघर्षाचा आहे. खन्ना हे फार हुशार विद्यार्थी होते. मद्रास येथील नामांकित आयआयटी कॉलेजमधून त्यांनी 1986 साली केमिकल इंजिनीअरची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी क्वालिटी मिल्क फूडस नावाने आईसक्रिमचा बिजनेस सुरू केला जो नंतर 1995 साली हिंदुस्तान लिवर या कंपनीला विकला. खन्ना म्हणतात की, 1995 साली क्वालिटी कंपनी विकल्यानंतर जो पैसा आला त्याचे काय करायचे? कुठे गुंतवायचे ? असा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शेअर मार्केटबाबत त्यांना काहीच गंध नव्हता. शेअर मार्केटमध्ये गुंतणूक करणे हा एक छंद आहे त्याला व्यवसायाचे रुप नाही देता येत नाही, अस त्यांचे मत होतं. तरीही शेअर मार्केटमधील काही ज्ञान नसताना त्यांनी 1996-97 ला सत्यम कॉम्प्यूटरच्या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. कारण फक्त एकच होते की त्यांच्या शेजारचा एक मुलगा सत्यममध्ये नोकरी करीत होता. 

    जवळ होते तेवढे पैसे त्यांनी त्यावेळी सत्यम व इतर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतविले. त्यावेळी सर्व आयटी कंपन्यांचे शेअर ओव्हरव्हॅल्यूड झाले होते या वस्तूस्थितीपासून ते अनभिज्ञ होते. शेवटी जे व्हायचे ते झालेच. 2000 साली शेअर मार्केटमध्ये स्फोट झाला व सर्व आयटी शेअर्सच्या किंमती कोसळल्या. पण या स्फोटातही खन्ना यांना फायदाच झाला. कारण शेअर कोसळसे जरी असले तरी त्यांची गुंतवणूक ही कमी होऊन तीन पट राहीलीच होती. ही गुंतवणूक काढून ते बाहेर पडले पण त्यांना या स्फोटामुळे फार मोठा मानसिक झटका बसला होता. त्यावेळी त्यांनी ठरविले की नशिबाने वाचलो पण यापुढे आता शेअर मार्केटमध्ये विचार करून सुरक्षित गुंतवणूक करायची. तरीही पुढे एक दशक त्यांना शेअर मार्केटमध्ये संघर्षच करावा लागला. 

    खन्ना आयुष्यात टर्निंग पॉईंट आला  तो 2003 साली जेव्हा ते दिल्लीमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी फिरत होते. फ्लॅटची शोधाशोध करताना त्यांच्या डोक्यात त्यावेळी युनिटेक नावाची रिएलिटी कंपनी बसली याचे कारण म्हणजे युनिटेकचे लक्झरियस ऑफीस. त्यांनी कंपनीची माहिती घेण्यास सुरूवात केली. कंपनीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की युनिटेकची मार्केट कॅपिटल ही रुपये 100 करोडची असून कंपनीच्या शेअरमध्ये सिटी बॅंकसहित फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर्स (एफआयआय)ची खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. कंपनीच्या बिजनेस स्ट्रक्चरवर प्रभावित होऊन त्यांनी फ्लॅट खरेदी करण्याचा विचार बाजूला ठेवला. तब्बल 5-7 लाख रुपये युनिटेक कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवून विसरून जायचे ठरविले. 2008 साली रिएलिटी इस्टेट सेक्टरला सुगीचे दिवस आले. सर्व रिएलिटी कंपन्यांच्या शेअरच्या किंमती प्रचंड प्रमाणात वधारल्या आणि खन्ना यांचे 5-7 लाख रुपयांचे झाले 25 करोड रुपये. त्यावेळी त्यांचे भांडवल दुप्पट, तिप्पट नाही तर पाचशे पट वाढले होते. 

    त्यानंतर त्यांनी कॉस्मेटीक प्रॉडक्ट कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतविण्यास सुरू केले. त्यांची पत्नी ज्या कंपनींचे सौंदर्य प्रसाधने वापरत होती त्या कंपन्यांना त्यांनी गुंतवणुकीसाठी निवडले. त्यांचे म्हणणे होते की ज्या कंपन्यांची सौंदर्य प्रसाधने महिलांना आवडतात त्या कंपन्यांचा खप नक्कीच चांगला होणार व त्यांना पुढे भविष्य आहे. गुंतवणुकीची ही त्यांनी कल्पना चांगलीच काम करून गेली. यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ आणखीच फुगला. 

    2008 साली खन्ना यांना अडचणीचा सामना करावा लागला त्याचे कारण ग्लोबल क्रिसीस. 2008 साली ग्लोबल मार्केटसह भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली व शेअर मार्केट कोसळला. परिणामी खन्ना यांची संपत्ती 75 टक्क्यांनी घसरली त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले. परंतु पुढे मार्च 2009 साली थोडी रिकवरी मिळाली त्यांनी पुन्हा उभारी घेतली यश संपादन केले. शेअर मार्केटमध्ये त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल जेव्हा मिडीया कौतुक करते तेव्हा ते म्हणतात की, ही काही फार मोठी कौतुकाची गोष्ट नाही. माझ्या यशाचं, पोर्टफोलिओचं एवढं कौतुक करण्याची काही गरज नाही कारण मी एवढा "मुर्ख" आहे की "बाय" केलेला शेअर केव्हा "सेल" करावा हे मला अजिबात कळत नाही. म्हणून मी एकदा शेअर "बाय" केला की त्याला विसरून जातो. जेव्हा तो बुस्ट होतो, खूप वाढतो तेव्हा मला कळतं की आपल्याला खूप फायदा झाला आहे बाकी काही नाही. ते म्हणतात की, "बाय एन्ड होल्ड" या टेक्निकमुळेच माझा पोर्टफोलिओ मल्टीबॅगरचं रुप घेतो. 

    खन्ना त्यांच्या फॉलोअर्सला सांगतात की, इन्वेस्टमेंट अगदी तरूणपणापासून करावी म्हणजे तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील. जर कोणाला आपली संपत्ती वाढवायची असेल तर शेअर मार्केटपेक्षा चांगला कुठलाच पर्याय नाही. पण त्यासाठी गरजेचा आहे संयम. म्हणूनच ते "बाय एन्ड होल्ड" या टेक्निकवर विश्वास ठेवतात व फॉलोअर्सलासुध्दा विश्वास ठेवा असं सांगतात. आणखी एक गोष्ट ते नेहमी सर्वांना सांगत असतात ती म्हणजे आयरीश लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे वाक्य... "जे आयुष्यभर चुका करून धडपड करीत जीवन व्यतीत करतात ते आयुष्यात काहीही न करणार्यांपेक्षा कितीतरी पटीनं यशस्वी व सन्माननिय असतात."
(Published On 18/04/2020)

News-In-Focus