100 पेक्षा जास्त महिलांना सक्षम करणारी उषा 

100 पेक्षा जास्त महिलांना सक्षम करणारी उषा 
    2012 साली गया (बिहार) येथील अंजू देवीवर अशी वेळ होती की तिला कुठेही जॉब मिळत नव्हता. नोकरी गेल्यामुळे घरी बसलेला पती, ती व दोन मुले असा त्यांचा संसार खूप अडचणीत आला होता. नोकरीसाठी अंजू दररोज भटकत होती पण कुठेही संधी मिळत नव्हती. त्याचवेळी एकेदिवशी तिला एक आशेचा किरण दिसला तो म्हणजे विणकाम करण्याचं मोफत प्रशिक्षण देणारी जाहिरात. शहरामध्ये एका संस्थेने महिलांना स्वतच्या पायावर उभं राहण्याच्या हेतुने विणकाम शिकविणारं एक मोफत प्रशिक्षण आयोजित केलं होतं. तिने लगेच तेथे प्रवेश घेतला. 

    आता 2019ला म्हणजे सात वर्षांनंतर अंजू विणकामात खूप तरबेज झाली आहे. ती आपल्या विणकामाच्या कौशल्याने सुंदर असे इअरिंग्ज, हेअर क्लिप्स, नेकलेस वगैरेच्या लेसेस तयार करू शकते ज्यांना बाजारपेठेत खूप मागणी आहे. ती आता चांगले पैसे कमविते तेही घरबसल्या, मुलांकडे लक्ष देऊन. याचं सर्व श्रेय ती देते "संमूलम" या संस्थेच्या उषा प्रजापती यांना. संमूलन ही एक गया येथील संस्था आहे जी महिलांना रोजगार उपलब्ध करून सक्षम करण्याचं काम करते. 

    संमूलन ही उषा प्रजापती या 39 वर्षीय महिलेने 2012 स्थापन केलेली संस्था आहे. माझ्या जन्म स्थानासाठी व येथील महिलांसाठी काहीतरी करण्याची माझी नेहमीच इच्छा होती, धडपड होती म्हणूनच मी संमूलन ही संस्था स्थापन केली आहे, असं संमूलनची संस्थापिका-संचालिका उषा सांगते. उषा ही एक क्राफ्ट डिझायनर व कन्सल्टन्ट आहे. ती देश-विदेशातील कंपन्यांना क्राफ्ट पुरविण्याचं काम करते. आज उषाच्या संमूलन या संस्थेमुळे 100 पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला आहे व त्या सक्षम झाल्या आहेत. 

    गया येथील डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केल्यावर 19 व्या वर्षी उषाने डिझाईनिंगमध्ये डिग्री करण्यासाठी अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन गाठलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एका कॉर्पोरेट एक्स्पोर्ट कंपनीमध्ये नोकरी करू लागली. या कंपनीच्या नोकरीत तिचं मन लागत नाही याची जाणीव तिला होऊ लागली. तिचा सर्व कल नोकरीपेक्षा समाजकार्याकडे होता. म्हणून नोकरी सोडून तीने उत्तराखंड येथील एका सामाजिक प्रोजेक्टमध्ये उडी घेतली. 

    या प्रोजेक्टमध्ये काम करीत असताना उषाची ओळख डिझाईन क्षेत्रासंबंधित देश-विदेशातील मोठ-मोठ्या संस्था, कंपन्या तसेच व्यक्ती यांच्याशी झाली. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात काम करताना तिला नेपाळ, थायलंड, श्रीलंका अशा देशांमध्येही जाण्याची संधी मिळाली. 

    संमूलन ही संस्था सुरू होण्याचे बीज 2009 साली रोवली गेली.  2009 मध्ये उषाला पुढील शिक्षणासाठी फोर्डकडून फेलोशिप मिळाली. त्यासाठी तिने मास्टर्स इन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एन्ड सोशल चेंजमध्ये प्रवेश घेतला. एकदा अमेरिकेत ती आईबरोबर एका सामाजिक कार्यक्रमाला गेली होती. कार्यक्रम सुरू असताना तिच्या शेजारी बसलेली तिची आई काहीतरी विणकाम करीत होती हे तिनं बघितल तेव्हा ती आईला म्हणाली की, आई तू किती सुंदर व परफेक्ट विणकाम करतेस. या विणकामाच्या स्किलवर तू आयुष्यात खूप काहीतरी मोठं काम करू शकली असतीस. यावर तिची आई तिला म्हणाली की, माझी वेळ तर निघून गेली तुम्हाला मोठं करण्यात पण तू सुध्दा खूप शिकली आहेस, तू का काहीतरी मोठं काम करीत नाहीस. 

    आईने दिलेलं हे उत्तर उषाच्या मनात एक मोठा प्रश्नचिन्ह करून बसलं. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर उषा तिचं मूळ शहर गया येथे परत आली. गया येथे आल्यावर तिला घरात स्वस्थ बसवत नसे. काहीतरी काम मिळविण्याच्या हेतुने ती बाहेर पडायची, शहरात भटकायची. असच एकदा फिरत असताना ती एका अगरबत्तीच्या कारखान्यात गेली जेथे शेकडो महिला काम करीत होत्या. तेव्हा तिने एका महिलेला या कामाचा मोबदला म्हणून महिन्याला किती मिळतात. त्या महिलेचे उत्तर ऐकल्यावर उषा थक्क झाली. कारण त्या महिलेचे उत्तर होते 200 रुपये. उषाने मनात विचार केला की या महिलेला 7-8 तास राबून महिन्याला 200 रुपये मिळतात जेवढे मी एकवेळच्या कॉफीसाठी खर्च करते. यामुळे ती अस्वस्थ झाली. तिच्या डोक्यात एकच विचार घोळत होतात तो म्हणजे या महिलांची मिळकत वाढणे फार गरजेचं आहे, यांची परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या आई-वडीलांशी चर्चा करून त्यांना मनातील कल्पना सांगितली व मग जन्म घेतला संमूलन या संस्थेने. 

    पुढे उषा सांगते की, संस्था सुरू करण्यासाठी वडिलांनी त्यांच्या गॅरेजची जागा दिली. तेथेच एक शेड बांधून ट्रेनिंग वर्कशॉप उभारलं. येणार्या महिलांना विणकामाचं ट्रेनिंग देण्यासाठी उषाची आईही पुढे सरसावली. मोफत प्रशिक्षणची शहरात जाहिरात देण्यात आली. पहिल्या प्रशिक्षणाला थोड्यात महिला आल्या पण वर्कशॉप सुरू झालं. पहिल्या ट्रेनिंगमध्ये ज्या महिल्या शिकल्या त्यांच्यामदतीने इअरींग्ज, हेअरक्लिप्स, नेकलेस असं साधारण 30 हजार रुपयांचे क्राफ्ट्स तयार करण्यात आले. हे प्रॉडक्ट नंतर दिल्ली येथील एका शॉपिंग फेस्टिवलमध्ये ठेवले असता हातोहात खपले. मुली-महिलांना विणकाम केलेले हे प्रॉडक्ट खूप आवडले. बस मग त्यानंतर संमूलनने कधीही मागे वळून बघितलं नाही.

    त्यानंतर हे प्रॉडक्ट जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचविण्यासाठी संमूलनला मार्केटिंगचा आधार घ्यावा लागला. पण जाहिरातबाजी करण्याइतकं त्यांचं बजेट नव्हतं. म्हणून उषाने इंटरनेट व तिचे देश-विदेशात असणारे वेगवेगळ्या संस्था, व्यक्ती यांची ओळख याद्वारे संमूलनचं प्रमोशन केलं. आज संमूलनमध्ये 100 पेक्षा जास्त महिलां काम करतात, त्यांना योग्य व हक्काचा रोजगार मिळाला आहे. संमूलनच्या प्रॉडक्ट्सना आता देश-विदेशात मागणी आहे. वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर हे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत व ते एका क्लिकद्वारे मागविता येतात, असं उषा अभिमानाने सांगते. 

    संमूलनच्या 7 वर्षांतील प्रवासाकडे मागे वळून बघताना उषा म्हणते की तिचे आई-वडील, भावंड, पती व संमूलनसाठी एवढी वर्ष राबणारा महिला स्टाफ यांच्या मदतीच्या जोरावर हे शक्य झालं. तिला अभिमान आहे की संमूलन वाढवितांना अनेक अडचणी आल्या पण तिने कुठल्याही बाहेरच्या फंडची अपेक्षा केली नाही किंवा गरजही वाटली नाही. कारण संमूलनचा जन्म हा महिलांना सक्षम व स्वावलंबी बणविण्यासाठी झाला आहे. ती आईचे आभार मानते की तिच्या एका बोचर्या टीकेने हे सगळं घडलं आता आईसुध्दा म्हणते की मी मोठं काही करू शकले नाही पण तू करून दाखवलं.
(Published On 14/03/2020)

News-In-Focus