"इन्वेस्टमेंट गुरू"... पीटर लिंच

"इन्वेस्टमेंट गुरू"... पीटर लिंच
    गातल्या प्रसिद्ध गुंतवणूक गुरूंमध्ये पीटर लिंच यांचे नाव अत्यंत वरच्या स्थानावर आहे. अमेरिकेत जन्मलेले आणि वाढलेले पीटर लिंच हे म्युच्युअल फंड मॅनेजर आहेत. अमेरिकेतील फिडीलीटी इन्वेस्टमेंट्‌स या कंपनीच्या मॅगेलन फंडचे ते १९७७ ते १९९० या तेरा वर्षांच्या काळात फंड मॅनेजर होते. या काळात या फंडकडून सातत्याने वार्षिक २९ टक्के रिटर्न देण्याचा विक्रम त्यांनी केला. या फर्ममध्ये ते रूजू झाले तेव्हा तिच्याकडे केवळ २० दशलक्ष डॉलरचे अॅसेट्‌स होते. पण तेरा वर्षांच्या कालावधीत लिंच यांनी या फर्मला १४ अब्ज डॉलरची महाकाय कंपनी बनवले. फिडीलीटी इन्वेस्टमेंट्‌स त्यांच्या ताब्यात होती तेव्हा दोन वर्षांचा अपवाद वगळता या फर्मने शेअर बाजारातही सातत्याने तेजी दर्शवली. 

    पीटर लिंच यांचा जन्म १९ जानेवारी १९४४ रोजी अमेरिकेतील न्यूटन या शहरात झाला. ते दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील कर्करोगाने निधन पावले. त्यांच्या आईनेच त्यांना वाढवले. १९६५ मध्ये लिंच बोस्टन विद्यापीठातून पदवीधर झाले. त्यावेळी त्यांचे विषय होते इतिहास, मानसशास्त्र आणि तत्वज्ञान. नंतर त्यांनी पेन्सिल्वानिया विद्यापीठातून एमबीए केले. 

    फिडीलीटी इन्वेस्टमेंट्‌स या फर्ममध्ये इंटर्न म्हणून लिंच १९६६ मध्ये रूजू झाले. पीटर लिंच हे फिडीलिटीचे अध्यक्ष डी. जॉर्ज सुलीवन यांच्याबरोबर त्यांच्या गोल्फच्या काठ्या सांभाळणारे बॉय होते. त्यावेळी  सुलीवन आणि त्यांच्या सहकार्यांमध्ये शेअर बाजारावर होणार्या चर्चा ऐकून त्यांना या क्षेत्राविषयी कुतूहल आणि रस निर्माण झाला. 

    पीटर लिंच यांनी केलेली पहिली यशस्वी गुंतवणूक म्हणजे फ्लाईंग टायगर नावाच्या कंपनीत त्यांनी केलेली गुंतवणूक. ही एक विमान फ्रेट कंपनी होती. या कंपनीचे शेअर्स त्यांनी खरेदी केले तेव्हा ते शिकत होते. त्यातून मिळालेल्या पैशांचा उपयोग त्यांना त्यांच्या कॉलेजची फी भरायला झाला. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी  फिडीलीटी या कंपनीत कापड आणि धातू विश्लेषक म्हणून ते रूजू झाले. 

    १९७७ मध्ये ते मॅगेलन फंडचे फंड मॅनेजर झाले. हा एक छोटा आक्रमंक कॅीपटल अॅप्रिसिएशन फंड होता. १९६३मध्ये तयार करण्यात आलेला हा फंड प्रामुख्याने देशांतर्गत गुंतवणुकीसाठी होता. लिंच यांनी या फंडचा ताबा घेतला तेव्हा या फंडमध्ये ज्यांनी १००० डॉलर गुंतवले होते, त्यांना लिंच यांनी तो फंड सोडला तेव्हा म्हणजे जवळजवळ तेरा वर्षांनी त्यांना २८ हजार डॉलर मिळाले. त्यांच्या व्यवस्थापनाखाली या फंडने दर वर्षी २९ टक्के रिटर्न दिला होता आणि दोन वर्षांचा अपवाद वगळता शेअर बाजारात त्याने सातत्याने तेजी दर्शवली होती. 

    पिटर लिंच यांनी गुंतवणुकीचे प्राईस-टू-अर्निंग्ज-ग्रोथ हे सूत्र शोधून काढले. पीईजी रेशो म्हणून ते प्रसिद्ध आहे. यातून गुंतवणूकदारांना एखादा शेअर त्याच्या वाढीची क्षमता लक्षात घेता तो किती स्वस्त आहे हे इतर व्हॅल्यूएशन प्रणालींच्या सहाय्याने पडताळून पाहता येते, हे लिंच यांनी दाखवून दिले. लिंच यांच्या विचारानुसार एखाद्या कंपनीविषयी, तिच्या बिझनेस मॉडेलविषयी आणि तिच्या फंडामेंटल्सविषयी एखाद्या गुंतवणुकदाराला स्वत:ला जे माहित आहे आणि जे त्याने माहित करून घेतले आहे, त्यायोगे तो स्वत: गुंतवणूक करून फायदा मिळवू शकतो. लिंच यांच्या मते दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते आणि ज्या कंपन्या शेअरबाजारात अंडरव्हॅल्यूड असतात अशा कंपन्यांतील गुंतवणूक दीर्घकाळात फायदेशीर ठरते. 

    लिंच यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शेअरबाजारात गुंतवणूक करणार्यांसाठी ती अतिशय उपयुक्त आहेत. वन अपऑन वॉल स्ट्रीट आणि बिटींग द स्ट्रीट ही त्यांची सर्वात गाजलेली पुस्तके आहेत. त्यांनी लिंच फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली असून त्याद्वारे ते मानवतावादी कार्य करत आहेत.
(Published On 04/04/2020)

News-In-Focus