उद्‌ध्वस्त गावांना उभे करणारा... निमल 

उद्‌ध्वस्त गावांना उभे करणारा... निमल 
    निमल राघवन, सॉफ्टवेयर डेवलपर. दुबईत सुखेनैव नोकरी करणारा एक ३१ वर्षांचा तरूण. नोव्हेंबर २०१८ मध्ये तो नेहमी जायचा तसा आपल्या गावी नदियमला गेला. कावेरी नदीच्या त्रिभुज क्षेत्रातील हे ते गाव. तेथे जाताना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना निमलला नव्हती. तेथे गेल्यावर त्याने जे पाहिले त्याने तो पूर्णपणे हादरून गेला. गज नावाच्या चक्रीवादळाने त्याचे गाव पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले होते. ते एकच गाव उद्‌ध्वस्त झाले नव्हते तर त्या भागातील ९० गावे होत्याची नव्हती झाली होती. 

    तामिळनाडूतील कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशातील हा भाग चक्रीवादळाने पूर्णपणे विस्कटून गेला होता. देशाचा "भाताचा वाडगा' म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध आहे. समृद्ध भातशेती हे या भागाचे वैशिष्ट्य. चक्रीवादळाने जीवितहानी झाली, लोकांची संपत्ती गेली, शेतजमीनींची वाताहत झाली, पशुधन गेले. लोकांनी शेतीच सोडून अन्य व्यवसाय नोकरी करायचे ठरवले. राघवन सांगतात की वादळाने या भागाची झालेली वाताहत पाहून तेथील लोक गाव सोडून जाऊ लागले. माझे मित्रही जे तेथे स्थायिक होण्याचा विचार करत होते त्यांनी हे प्रचंड नुकसान पाहून त्यांचा विचार बदलला. इतकेच नाही तर जे शेतकरी पिढ्यान्‌पिढ्या शेती  हाच व्यवसाय करत होते, त्यांनी आपला जगण्याचा हा एकमेव स्रोत सोडून शहरांचा रस्ता धरला. हे सगळे पाहून मी खूप अस्वस्थ झालो आणि मग बराच विचार केल्यानंतर राघवन यांनी कुणी स्वप्नातही करणार नाही असा विचार केला. त्यांनी दुबईतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडायचा निर्णय घेतला. त्यांनी आधी नदीयम येथे येऊन तेथील आणि वादळाने उद्‌ध्वस्त झालेल्या आजूबाजूच्या ९० गावांतील जनजीवन सुरळीत करण्याचे ठरवले. सुरूवातीला त्यांनी मदत कार्य सुरू केले. त्यांनी सोशल मिडियावर एक जोरदार मोहीम चालवली "बाऊन्सबॅकडेल्टा. त्यातून संपूर्ण जगभरातून त्यांना कपडे, किराणा सामान, इतर अत्यावश्यक वस्तू आणि पैशांची मदत मिळाली. ही मदत गज वादळाने प्रभावित झालेल्या ९० गावांसाठी जणू संजीवनी होती. त्यानंतर त्यांच्या नदीयम गावातील काही तरूण राघवन यांच्याबरोबर काम करू लागले. त्यांच्या मदतीने राघवन यांनी डेल्टासॅपलींगचॅलेंज ही नवी मोहीम राबवली. या मोहीमेद्वारे वादळात नष्ट झालेल्या झाडांमुळे झालेले नुकसान भरून काढण्याचा राघवन यांचा प्रयत्न होता. 

    दोन महिने राघवन यांचे प्रयत्न चालू होते. त्यांच्या लक्षात आले की केवळ मदत कार्यावर आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला पाहिजे याची जाणीव राघवन यांना झाला. हा तोडगा असा हवा होता की त्यामुळे गावांमधील लोक पुन्हा आपल्या पायावर उभे राहतील आणि जे शेतकरी शेती सोडून शहरांकडे जाऊ लागले होते, ते पुन्हा शेतीकडे वळतील. राघवन आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यासाठी प्रथम शेतकर्यांना रोपे पुरवण्याचे ठरवले. पण त्यापूर्वी त्यांनी त्या भागातील सर्व खेडेगावांचा प्रवास केला. तेथील शेतकर्यांशी संवाद साधला. सगळ्यांची एकच तक्रार होती, शेती वगैरे आम्ही करू. पण शेती टिकण्यासाठी आवश्यक असणारे पाणी कुठून आणायचे?

    या त्रिभुज क्षेत्रातील स्वच्छ पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे कावेरी नदी. या नदीचा उगम कर्नाटकात होतो आणि त्रिभुज भागात तिचा प्रवास संपतो. थोडक्यात हा प्रदेश नदीच्या शेवटच्या टोकाकडे आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यातील कावेरी नदीच्या पाण्यावरून चाललेला वाद प्रसिद्ध आहे. पण त्याचा फटका या भागातील लोकांना सर्वाधिक बसतो आहे. या नदीचे केवळ ५० ते ६० टक्के पाणीच येथे मिळते. त्यातही साठवणुकीची योग्य व्यवस्था नसल्याने त्यातील बरेचसे म्हणजे जवळजवळ १५० टीएमसी म्हणजे लाखो क्युबिक फूट पाणी वाया जाते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि पाण्याची साठवणूक करण्यासाठी राघवन यांनी पुढाकार घेऊन एक नवाच प्रयोग केला. त्यांनी त्या भागातील तळी, कालवे यांचे पुनरूज्जीवन करण्याचे ठरवले. 

    त्यातूनच मग कैफा म्हणजे कदईमदई एरिया इंटीग्रेटेड फार्मर्स असोसिएशनची स्थापना झाली. या संघटनेने पहिलाच प्रयोग हाती घेतला तो त्या भागातील प्रसिद्ध पेरावुरानी तलावाचे पुनरूज्जीवन करण्याचा. पेरावुरानी तलाव या भागातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठा तलाव. जवळजवळ ५६४ एकर भूभागात पसरलेला. या तलावात या भागातील सगळ्या शेतीची पाण्याची गरज भागवण्याची क्षमता होती. पण माती माफियांनी सातत्याने केलेल्या गैरवापरामुळे या तलावात पुरेसे पाणी साठतच नव्हते. 

    राघवन आणि त्यांच्या सहकार्यांनी या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. हे काम सुरू केले तेव्हा त्यांच्याबरोबर फक्त अकरा माणसे होती आणि हातात केवळ वीस हजार रूपये होते. गाळ काढण्याची मोठमोठी यंत्रे भाडेपट्टीवर आणण्याचे काम प्रचंड खर्चिक होते. दिवसाला चाळीस हजार ते साठ हजार रूपये खर्च होत होते. हा पैसा उभा करणे अवघड होते. सरकारकडून काहीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. शेवटी पोंगाडू आणि पझाया या दोन गावांतील लोकच मदतीला धावले. त्यांनी दारोदार जाऊन जवळजवळ २ लाख रूपये गोळा केले. कुणी आपली सगळी बचत दिली. एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याने तर लग्नात आलेला सगळा आहेर या कामासाठी दिला. पैशाचा हा सगळा व्यवहार पारदर्शी रहावा म्हणून राघवन यांनी आपल्या व्हॉट्‌सअॅप वर त्याचा हिशोब द्यायला सुरूवात केली. देणगी देणार्यांची नावे, फोटो, किती देणगी दिली हा सगळा तपशील ते या ग्रुपवर देऊ लागले. जसे पैसे येऊ लागले तसे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला वेग येऊ लागला आणि केवळ १०४ दिवसांत त्यांनी तलावाच्या २५० एकर भागातील गाळ काढला तलावाच्या सीमाही निश्चित केल्या- चार किमी एका बाजूला, १२.५ किमी दुसर्या बाजूला. गाळ काढल्याने तलावाची खोलीही वाढली आणि त्यात पाणी साठू लागले. 

    या तलावात राघवन आणि त्यांच्या सहकार्यांनी तीन बेटे तयार केली आणि त्यावर प्रत्येकी २५,००० स्थानिक झाडांची रोपे लावली. पाऊस येण्यासाठी त्याची मदत होऊन भूजलात वाढ व्हावी हा त्यामागे हेतू होता. त्याचबरोबर वातावरणातही गारवा त्यामुळे राहणार होता. या तलावाबद्दल राघवन सांगतात की, आता तलावात त्याच्या क्षमतेच्या ७० टक्के पाणी साठत आहे. लोकांसाठी हा मोठा चमत्कार होता. असा विकास होण्याची ते जवळजवळ वीस वर्षे वाट पाहत होते. पेरावुरानी तलावाचे पुनरूज्जीवन झाल्याने वाया जाणार्या दीडशे टीएमसी पाण्याची बचत झाली आणि त्यामुळे जवळजवळ तीन लाख लोकांचे जीवनमान सुधारले. 

    आता या भागातील पाण्याची टंचाई दूर झाली आहे आणि त्यामुळे लोक शेतीकडे वळू लागले आहेत. पूर्वी बोअरवेल खोदायची झाली तर जमिनीत ८०० ते १००० फूट खोदावे लागत असे. आता १५० ते २०० फूटावरच पाणी लागते. निमल राघवन या भागातील लोकांसाठी जणू देवदूत होऊन आले असल्याची भावना इथले लोक बोलून दाखवतात. आता या भागातील इतर तलावांना पुनरूज्जीवन करण्याचे कामही निमल राघवन यांनी हाती घेतले आहे आणि या कामात त्यांना तरूणांची साथ लाभत आहे. अलिकडेच पेरावुरानी तलावाचे त्यांनी समारंभपूर्वक लोकार्पण केले. पण त्यांचे काम थांबलेले नाही. आता या भागातील जवळजवळ ५४ पाण्यांचे साठे पुनरूज्जीवित करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यातील प्रमुख कालवा आहे ग्रॅंड अनाईकट कालवा. ९४ एकर परिसरात पसरलेल्या कालव्यातील गाळ काढण्याचे काम आता त्यांनी हाती घेतले आहे. 

    आपण खात असलेल्या अन्नाच्या प्रत्येक दाण्यामागे शेतकर्यांचे अथक श्रम असतात. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी सतत संकटात असतो. त्यांच्या दैनंदिन प्रश्नांकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छ पाणी ही शेतीची प्रमुख गरज आहे आणि ते मिळाले तरच शेती वाचेल आणि शेतकरीही. आणि पर्यायाने आपणही. याचे भान आपण ठेवायला हवे. 
(Published On 11/04/2020)

News-In-Focus