प्रवाहाविरोधात जाणारी डॉक्टर... डॉ. बिंदू मेनन

प्रवाहाविरोधात जाणारी डॉक्टर... डॉ. बिंदू मेनन
    कदा एखादी व्यक्ती डॉक्टर झाली की मोठ्या शहरात मोठे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्याचे स्वप्न बाळगून असते. अशा वेळी दुर्गम भागातील खेडेगावांत जाऊन त्यांच्यावर मोफत उपचार करणे, तेही मेंदूच्या विकारांवर हे आपल्याला अशक्यप्राय वाटणारीच गोष्ट आहे. पण डॉ. बिंदू मेनन यांनी या सरधोपट विचाराला बाजूला सारून "आम्ही पोचतो, आम्ही शिकवतो आणि आम्ही उपचार करतो (वुई रिच, वुई टीच अँड वुई ट्रीट)' हा नारा घेऊन त्या आंध्र प्रदेशातील खेड्यांपाड्यांत जाऊन तेथील गरीब रूग्णांवर मोफत उपचार करतात, तेही मेंदूच्या विकारांवर. 

    आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील डॉ. बिंदू मेनन या गेली चार वर्षे  दर रविवारी आपली मिनी व्हॅन आणि सहकार्यांना बरोबर घेऊन आंध्र प्रदेशातील दुर्गम खेड्यांतून मेंदूच्या विकाराने त्रस्त असलेल्या रूग्णांना उपचार देण्यासाठी फिरत असतात. आपल्या देशात आरोग्याकडे लक्ष देण्याची मुळातच वृत्ती नाही. त्यात खेडेगावांमध्ये तर आरोग्याविषयी जागरूकताही नाही आणि लक्षही दिले जात नाही. आज इंटरनेटच्या युगातही हीच परिस्थिती आहे. 

    डॉ. बिंदू मेनन मेडीकल कॉलेजमध्ये असताता मेंदूच्या विकाराने गलितगात्र झालेल्या अशा रूग्णांची गर्दी तेथे पाहत होत्या. अनेक रूग्ण तर अतिशय गंभीर अवस्थेत असत. अनेक वर्ष केलेले दुर्लक्ष आणि जागरूकता नसल्याने हे घडत होते. आजही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. 

    डॉ. मेनन यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय नेल्लोरमध्ये सुरू केला. पण त्यांना मनातून सारखे कॉलेजमध्ये येणारे मेंदूचे रूग्ण सारखे आठवत रहायचे. त्यांच्यासाठी काही तरी करायला हवे असे त्यांना वाटत होते. हे करण्यामागे आणखीही एक कारण होते, ते म्हणजे इतर विकारांच्या तुलनेत मेंदूचे विकार हे जास्त गंभीर आणि गुंतागुंतीचे असतात. उदाहरणार्थ, अर्धांगवायूचा झटका आलेल्या रूग्णाला पूर्ववत होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. तेही त्याने नियमितपणे औषधे आणि फिजिओथेरपी घेतली तर. आणि जर एखाद्याला सेरेब्रल स्ट्रोक आला तर तो कदाचित आयुष्यभर पंगू होऊ शकतो आणि त्याला आैषधेही आयुष्यभर घ्यावी लागतात. 

    आपल्या देशातील दुर्गम खेड्यांमध्ये आधीच आरोग्याबाबत जागरूकता नाही. त्यामुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या रूग्णांना योग्य उपचार मिळणे दुरापास्त होऊन बसते. आधी रूग्ण जागरूक नाही आणि गावांत सुविधा नाहीत या दोन अत्यंत गंभीर समस्या असल्यामुळे तर उपचार होतानाच दिसत नाहीत. आणि उपचार झालेच तर रूग्ण जरा बरे वाटू लागले की औषधोपचार घ्यायचे थांबवतो आणि त्यामुळे पुन्हा झटका येतो आणि तो जीवघेणाही ठरू शकतो. 

    अनेकांसाठी तर उपचार हीच चैन असते. मग ते गावातच मिळणार्या काही जुजबी उपचारांचा आधार घेतात आणि परिस्थिती अधिकच बिकट होते. हे सर्व पाहून डॉ. बिंदू मेनन यांनी एक निर्णय घेतला आणि गावांतील अशा रूग्णांपर्यंत पोचून त्यांना योग्य वैद्यकीय उपचारांची सोय करून देण्याचे ठरवले. २०१५ मध्ये त्यांनी एक मोहीम सुरू केली, "न्यूरॉलॉजी ऑन व्हील्स.'  सर्व वैद्यकीय साधनांनी सुसज्ज अशी एक मिनी व्हॅन घेऊन त्या आपल्या सहकार्यांबरोबर आंध्र प्रदेशातील अतिमागास आणि मागासलेल्या खेडेगावांत जाऊन मेंदूच्या विकाराने त्रस्त रूग्णांवर उपचार करायला सुरूवात केली. त्यांची ही मोहीम पूर्णपणे मेंदूविकाराच्या रूग्णांसाठी आहे. गेल्या चार वर्षांत त्यांच्या या मोहिमेने आंध्र प्रदेशातील २३ गावांमध्ये उपचार मिळवून दिले आहेत. 

    प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी डॉ. मेनन आपली मिनी व्हॅन आणि सहकारी आणि स्वयंसेवक यांच्या समवेत आंध्र प्रदेशातील दुर्गम आणि मागासलेल्या गावांमध्ये जातात, अर्धांगवायू, अपस्मार (एपिलिप्सी) आणि सामान्य मेंदूविकारांबाबत जनजागृती आणि उपचार करण्याचे काम करतात. त्या उपचार पूर्णपणे मोफत करतात. न्यूरॉलॉजी ऑन व्हील्सबरोबर त्यांनी २०१६मध्ये अपस्माराच्या मदतीसाठीही एक अॅप लॉंच केले. एपिलिप्सी हेल्प नावाचे हे अॅप अपस्माराच्या रूग्णांच्या कुटुंबियांना रूग्णाच्या स्थितीविषयी सावध करण्यासाठी या अॅपचा उपयोग होतो. याशिवाय त्यांनी देशभरात एक टोल फ्री हेल्पलाईन सेवाही सुरू केली आहे. त्यावर आपल्याला मेंदूच्या विकारांविषयी माहिती मिळू शकते. 

    डॉ. मेनन गेली वीस वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांनी २०१३मध्ये डॉ. बिंदू मेनन फाउंडेशनची स्थापना करून आपल्या समाजकार्याला सुरूवात केली. सुरूवातीला त्यांनी गरीब आणि मागासलेल्या  रूग्णांसाठी मोफत तपासणी शिबीरे आणि मोफत औषधे वाटप केंद्रे सुरू केली. त्यांना किमान एक महिन्याची औषधे दिली जातात  आणि जर त्यापुढेही त्याला उपचाराची गरज भासली तर स्थानिक इस्पितळांमध्ये त्याच्यावर तो बरा होईपर्यंत मोफत उपचार दिले जातात. 

    डॉ. मेनन यांना शाळेत असल्यापासूनच मेंदू आणि त्याचे कार्य याचे आकर्षण होते. त्यांनी खूप आधीपासूनच मेंदूविकारतज्ज्ञ व्हायचे हे ठरवले होते. त्याप्रमाणे त्या न्यूरॉलॉजिस्ट झाल्याही. अर्धांगवायूच्या झटक्याप्रमाणेच अपस्मार हा विकारही तितकारच गंभीर आहे आणि त्याबाबतही जागृती होण्याची आवश्यकता आहे. रूग्णांना त्याची कारणेच माहीत नसतात आणि मग काहीतरी जुजबी उपचार केले जातात. अशा आजारांविषयीचे गैरसमज दूर करून रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य उपचार करून घेण्यास उद्युक्त करणे हे महत्वाचे काम डॉ. मेनन करतात. 

    न्युरॉलॉजी ऑन व्हील्स : त्यांच्या या व्हॅनमध्ये त्यांची पूर्ण टीम असते. आंध्र प्रदेशातील सर्वात दुर्गम भागातील खेडेगाव आधी निवडले जाते. तेथील सरपंचांशी संपर्क साधून त्यांना आपल्या कार्याची माहिती डॉ. मेनन देतात आणि मग सरपंचांच्या मदतीने त्या गावात वैद्यकीय शिबीर घेतात. एकदा शिबीराची तारीख ठरली की ग्रामपंचायत गावात सर्वांना त्याबाबत कळवते. बहुतांश ठिकाणी ग्रामस्थांचा प्रतिसाद सकारात्मकच असतो. कारण शहरातून एक डॉक्टर आपल्याला काही माहिती सांगायला, उपचार करायला येत आहे याचे त्यांना अप्रूप आणि कुतूहल असते. वैद्यकीय तपासणी शिबीरात डॉ. मेनन, अर्धांगवायू, अपस्मार, उच्च रक्तदाब, मधुमेह वगैरे विकारांची सविस्तर माहिती देतात. तेथे उपस्थित लोकांना त्याविषयी बोलते करतात. दीर्घकाळ उपचार घेण्याचे फायदे समजावून सांगतात. त्यानंतर उपचार शिबीर सुरू होते. रूग्णांवर उपचार डॉ. मेनन यांच्या व्हॅनमध्येच केले जातात.  एका दिवसात सरासरी १५० रूग्णांवर उपचार होतात त्यातील २० टक्के रूग्ण हे मेंदूविकारांचे असतात. 

    या शिबीरांमध्ये अन्य विकारांचे रूग्णही येतात. त्यांना डॉ. मेनन स्थानिक इस्पिळांत संबंधित डॉक्टरांकडे पाठवतात.  आतापर्यंत डॉ. मेनन यांनी १६० शिबीरे आयोजित केली आहेत. कॉलेज आणि शाळांमध्येंही शिबीरे आयोजित केली जातात. तरूणांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करावा असे डॉ. मेनन यांना वाटते, जेणेंकरून भविष्यात त्यांना जीवनशैलीशी निगडीत आजारांचा सामना करावा लागणार नाही. त्याचप्रमाणे कुटुंबात कुणाला अचानक स्ट्रोक किंवा फीट आली तर काय प्रथमोपचार करायचे हेही त्या शिबीरात सांगतात. मेंदूविकारांवरील वैद्यकीय उपचार हे सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावेत अशी डॉ. मेनन यांची इच्छा आहे आणि त्यासाठीच त्या धडपडत आहेत. 
(Published On 29/02/2020)

News-In-Focus