जॉर्ज सोरोस :

जॉर्ज सोरोस "दि मॅन हू ब्रो दि बॅंक ऑफ इंग्लंड "

    जॉर्ज सोरोस हे नाव जागतिक फायनान्शियल मार्केटमध्ये अतिशय आदराने घेतले जाते. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार गेल्या वर्षी सोरोस यांचे नाव ४०० जणांमध्ये ६०व्या क्रमांकावर होते. ८ अब्ज डॉलरहून अधिक संपत्तीचे मालक असलेल्या जॉर्ज सोरोस यांनी लोककल्याणाच्या कामासाठी अब्जावधी डॉलरच्या देणग्या दिल्या आहेत. १९९२मध्ये ब्रिटीश पौंडवर त्यांनी लावलेल्या प्रसिद्ध बेटमुळे केवळ २४ तासांत १ अब्जहून अधिक डॉलरचा फायदा झाला आणि त्यांना "बॅंक ऑफ इंग्लंड तोडणारा माणूस' म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यांचा क्वांटम फंड गेली तीस वर्षे ३३ टक्के वार्षिक रिटर्न देत आहे. सोरोस हे सोरोस फंड मॅनेजमेंट एलएलसीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मानवतावादी कार्याने त्यांना जगभरात आदराचे स्थान आहे. पण त्यांची राजकीय मते तितकीच वादग्रस्त आहेत.  

    जॉर्ज सोरोस यांचा जन्म हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे १२ ऑगस्ट, १९३० रोजी झाला. ते जन्माने ज्यू. पण त्या काळात युरोपात ज्यूंविरोधात सुरू असलेल्या नरसंहारापासून वाचण्यासाठी त्यांच्या वडिलांनी १९३६मध्ये आपले मूळ आडनाव श्वार्ट्‌झ बदलून सोरोस हे नाव घेतले. त्यांच्या वडीलांचे नाव तिवादार. पहिल्या महायुद्धात ते युद्धकैदी म्हणून रशियन तुरूंगात होते. पण रशियन राज्यक्रांतीच्या वेळी ते तुरूंगातून निसटले आणि बुडापेस्टमध्ये परतले. हंगेरीवर नाझींचे आक्रमण झाल्यावर हंगेरियन ज्यूंचा होत असलेला छळ पाहत सोरोस मोठे होत होते. या काळात सोरोस कुटुंबियांनी आपल्या शेकडो देशबांधवांना देश सोडून जाण्यासाठी मदत केली. हे करताना अनेकदा त्यांना भूमिगत व्हावे लागत असे. संकटांचा पहाड असतानाही कसे तग धरून जगायचे हे जॉर्ज सोरोस या काळात शिकले. 

    १९४७मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. त्यांचे मार्गदर्शक कार्ल पॉपर यांनी "ओपन सोसायटी'  हा एक नवा शब्दप्रयोग चलनात आणला. याचा अर्थ कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीला विरोध करणे असा होता. याच काळात सोरोस यांच्या मानवतावादी आणि तत्वज्ञानी विचारांना आकार मिळाला. 

    १९५६मध्ये सोरोस अमेरिकेला गेले. न्यूयॉर्कमधील एम. एम. मेयर या कंपनीत अर्बिट्रेज ट्रेडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या कंपनीत काम करत असताना त्यांनी अमेरिकन शेयरबाजारातील अनेक फर्म्सबरोबर ट्रेडर आणि अॅनालिस्ट म्हणून काम केले. वॉल स्ट्रीटवर त्यांना ओळखही मिळाली. येथे त्यांनी त्यांचा पहिला ऑफशोअर फंड, द फर्स्ट इगल फंड, अरनॉल्ड अँड एस.ब्लिशरोडर यांच्याकडे १९६७मध्ये सुरू केला. या फंडला मोठे यश मिळाले मग त्यांनी १९६९मध्ये डबल इगल फंड हा दुसरा फंड सुरू केला. 

    १९७३मध्ये सोरोस आणि त्यांचे सहाय्यक जिम रॉजर्स यांनी ही फर्म सोडली आणि सोरोस फंड मॅनेजमेंट स्थापन केला. हेज फंड म्हणून याची रचना करण्यात आली होती. त्याचे नाव बदलून सोरोस फंड असे ठेवण्यात आले. पुढे १९७९मध्ये तेही नाव बदलून क्वांटम फंड असे ठेवण्यात आले. त्याची सुरूवात झाल्यापासून या फंडने ३,३६५ टक्के रिटर्न दिला आहे

    १९८१पर्यंत क्वांटम फंड ३८१ दशलक्ष डॉलरपर्यंत वाढला होता, तर सोरोस यांची सपंत्तीही १०० दशलक्ष डॉलरवर पोचली होती. सोरोस आता जगातील सर्वात महान मनी मॅनेजर झाले होते. सोरोस यांनी आता आपल्या क्वांटम फंडचे दैनंदिन व्यवस्थापन वेगवेगळ्या अनेक मॅनेजर्सना देऊ केले. १९८५ मध्ये या फंडने १२२ टक्के रिटर्न जनरेट केले. १९८६ पर्यंत सोरोस यांची संपत्ती १.५ अब्जावर पोचली. 

    १९८९मध्ये क्वांटम फंडच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्टॅन्ले ड्रकनमिलर यांच्याकडे दिली. ड्रकनमिलर यांनी १९९३पर्यंत या फंडमधून ४० टक्के रिटर्न जनरेट केला. १९९२मध्ये त्यांनी ब्रिटीश पौंड विरोधात लावलेल्या बेटने त्यांना १ अब्ज डॉलरचा फायदा मिळवून दिला. त्याचबरोबर टोकियो शेयर बाजारातील ट्रेडींग आणि स्विडीश क्रोना आणि इटलियन लिरा या चलनांद्वारेही त्यांना अंदाजे ६५० दशलक्ष डॉलर मिळवून दिले. 

    १९९३मध्ये सोरोस १ अब्ज डॉलर दर वर्षी मिळवणारे पहिले अमेरिकन ठरले. त्यांचा क्वांटम फंड वार्षिक ६१.५ टक्के रिटर्न देत होता. सोरोस यांनी आपली गुंतवणूक वेगवेगळे फंड तयार करण्यासाठी विभागली. क्वांटमच्या छताखालीच त्यांनी हे फंड सुरू केले. त्यात क्वांटम रियल्टी फंड आणि क्वांटम इंडस्ट्रीयल होल्डींग्ज फंडचाही समावेश आहे. हे फंडही ड्रकनमिलर यांनीच मॅनेज केले होते. 

    १९९१मध्ये त्यांनी कासार फंड सुरू केला. तर १९९७ पर्यंत त्यांनी आणखी सहा फंड सुरू केले. आज सोरोस यांचे फंड हे जोरात सुरू आहेत. वयाच्या ८९ व्या वर्षीही सोरोस कामात व्यग्र असतात. त्यांनी केलेल्या मानवतावादी कामांमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेतच. पण ट्रेडींगच्या क्षेत्रात पदार्पण करणार्यांसाठी त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आणि तितकाच प्रोत्साहक आहे.
(Published On 21/03/2020)

News-In-Focus