पिंजरा सफाई करताना बनला पर्यावरण रक्षक 

पिंजरा सफाई करताना बनला पर्यावरण रक्षक 

याच्या चौदाव्या वर्षांपासून आपली आवड जोपासत, त्याच प्रोफेशनमध्ये आयुष्य घालवणे हे खूप कठिण काम. मात्र अनंत अडचणी झेलून पर्यावरण रक्षणाची आवड जपली आहे ती बेंगलोर येथील वाइल्डलाइफ वॉर्डन प्रसन्ना कुमार यांनी. जनावरांचा पिंजरा साफ करताना झालेली प्राणीमात्रांशी दोस्ती इतकी गहरी बनली की प्रसन्ना आणि त्यांच्या टीमनं आतापर्यंत दोनशेहून अधिक प्राण्यांना जीवदान दिले आहे. 

बेंगलोर हे शहर पर्यावरणदृष्ट्या खूपच समृद्ध आहे. इथले जंगल, तलाव, पशू-पक्ष्यांतील विविधता अशी बायोडायव्हर्सिटी क्वचितच एखाद्या शहरात पहायला मिळेल. लोकांनी भरलेलं शहर हेही बेंगलोरचे वैशिष्ट्य. लोकांशी पर्यावरणाचं नातं जोडलं गेलं पाहिजे, ते टिकून राहिलं पाहिजे हीच माझी धडपड आहे. मला खूप आनंद होतो की अनेक लोकांना आता वन्यजीवांचे महत्त्व समजलं आहे.... प्रसन्ना कुमार सांगतात. प्रसन्ना यांची वयाच्या चौदाव्या वर्षी प्राणीमात्रांशी दोस्ती झाली. बेंगलोरपासून जवळच्या गावात राहणारे प्रसन्ना आपल्या आई-वडिलांसोबत 1992 मध्ये शहरात आले. गावात थोडी शेतजमीन होती, मात्र, त्यावर गुजराण करणे शक्य नव्हते. त्याकाळात बेंगलोरमध्ये वाइल्डलाइफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरचे काम सुरू होते. प्रसन्ना यांच्या आई-वडिलांना या हॉस्पिटलच्या उभारणीदरम्यान इथे काम मिळाले. तेथूनच त्यांच्या आयु्ष्याचा टर्निंग पॉइंट मिळाला.

प्रसन्ना जनावरांना सांभाळण्यासाठी स्टाफला मदत करायचे. कधी तेथील उपकरणांची सफाई कर तर कधी पिंजरे सफाई करणे ही छोटी कामे त्यांना आवडायची. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बोलण्यातून त्यांना पर्यावरणाचं महत्त्व उलगडत गेलं. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण आणि बायोडायव्हर्सिटी या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केला. 2008 मध्ये प्रसन्ना हे बेंगलोर महानगरपालिकेच्या फॉरेस्टसेल टीमशी जोडले गेले. फक्त ड्युटी म्हणून नव्हे तर कर्तव्य जपताना त्यांनी बीबीएमपीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. स्वतःला परिसरातील गावांशी जोडून घेतले. प्रसन्ना सांगतात, वाढत्या शहरीकरणादरम्यान, परिसरात एखादा साप आला असेल तर अथवा एखादे जंगली जनावर. त्याला ठार मारले जायचे. मात्र रेस्क्यू टीमला बोलवायला नागरिक तयार नसायचे. त्यामुळे आम्ही जाणीवजागृती सुरू केली. लोकांशी संवाद साधला आणि प्राणी, पक्षी आढळल्यास थेट फोनवर संपर्क साधण्यास सांगितले. हळूहळू जागृती होऊ लागली आणि मग लोकांचे फोन येऊ लागले. एक वेळ अशी आली की दिवसाला सरासरी 40 रेस्क्यू कॉल येऊ लागले. मग, मदतीचा विस्तार करण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू झाला. वॉर्ड स्तरावर लोकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, स्वयंसेवकांना मदत दिली जाऊ लागली. 

आजही प्रसन्ना आपल्या टीमसोबत सरासरी तीन रेस्क्यू ऑपरेशन करतात. गेल्या दोन महिन्यात त्यांनी 200 हून अधिक जनावरांचा जीव वाचवला आहे. याशिवाय सामाजिक आणि पर्यावरणीय भूमिका घेत प्रसन्ना यांच्या टीमने शहरात चायनीज मांजाच्या विरोधातील मोहीम राबवली. राज्य सरकारकडेही पाठपुरावा केला. पतंग फेस्टिव्हलच्या काळात अनेकदा पक्षी मांजात अडकून मृत्यूमुखी पडायचे. दीड वर्षांच्या प्रयत्नांनी प्रसन्ना यांनी अनेक पक्ष्यांना वाचवले. झाडांवर अकडलेले मांजा काढण्याची मोहीम राबवली. राज्य सरकारने गांभीर्य ओळखून मांजावर बंदी आणली. जनावरे वाचविण्याच्या कामात अनेकदा जीवघेण्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. जनावरे, पशू-पक्षी वाचवणे, त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे असे प्रसन्ना कुमार सांगतात. आजही बेंगलोरमध्ये अनेक रेस्क्यू कॉल अटेंड करताना प्रसन्ना आणि त्यांची टीम नोकरी म्हणून नव्हे तर एक मिशन म्हणून काम करताना दिसते. 

News-In-Focus