ग्रीन कमांडो विरेंद्र सिंह यांचे शाश्वत जल अभियान

ग्रीन कमांडो विरेंद्र सिंह यांचे शाश्वत जल अभियान

त्तीसगढचा आदिवासी भूभाग नजरेसमोर आला की अनेक लोकांच्या मनात एक चित्र उमटते. ते असते गेल्या अनेक वर्षांपासून हिंसा, संघर्षापासून झुंजणाऱ्या प्रदेशाचे. मात्र, याउलट आणखी एक नजारा येथे दिसतो. तो आहे इथे फुललेल्या हिरवाईचा. इथे घनदाट जंगलांचा असा प्रदेश आहे की जो शेकडो मैलांवरही संपत नाही. आपली शेकडो वर्षांची परंपरा सांभाळत नद्या वाहतात. त्यांची जबाबदारी स्वयंप्रेरणेने विरेंद्र सिंह यांनी घेतली आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते या कार्यात गुंतले आहेत. ग्रीन कमांडो किंवा जल स्टार अशा नावाने ते परिचित आहेत. आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.

छत्तीसगढ राज्यातील बालोद जिल्ह्यातील दल्लीराजहरा गावातील एका सामांन्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विरेंद्र सिंह यांना निसर्गाविषयी विलक्षण प्रेम आहे. त्यांच्या घराच्या आसपास प्रचंड वृक्षसंपदा होती आणि गावातील तलावात नेहमी पाणी असायचे. मात्र विकासाच्या वाटेवर हळूहळू वनराई लुप्त होऊ लागली. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. त्यातून लोकांमध्ये पर्यावरणाप्रती, आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीबाबत जागृतीही झाली आहे. मात्र, वीस वर्षांपूर्वी ज्यावेळी विरेंद्र सिंह यांनी, आपल्या गावातील लोक लाकडांसाठी जंगलतोड करीत असल्याचे पाहिले, तेव्हा हे रोखण्यासाठी ते पुढे आले. कॉमर्स विषयात शिक्षण घेतलेल्या विरेंद्र सिंह यांनी एम. कॉम. पूर्ण झाल्यावर पुन्हा अर्थशास्रात एम. ए.चं शिक्षण घेतलं. त्यानंतर सन २००० मध्ये ते एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यादरम्यान पर्यावरण संरक्षण अभियानाची सुरुवात त्यांनी केली. शाळेतील मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजून सांगत २५ मुलांची टीम तयार करून वृक्षारोपण मोहीम राबवली. मुलांना घेऊन दर शनिवारी वृक्षारोपण करण्यासोबत स्वच्छता मोहीम ते राबवत असत. सतरा वर्षांपूर्वी त्यांनी अडीचशे झाडे लावली आणि त्यांची देखभालही नियमित ठेवली. विरेंद्र सिंह दरवर्षी या झाडांचा वाढदिवसही साजरा करतात. 

विरेंद्र सिंह यांनी या कामासोबतच लोकांमध्ये परिवर्तन घडविणारे अभियान राबविण्यास सुरुवात केली. एक काळ असा होता की लोक माझ्या या कामाची हेटाळणी करायचे. मात्र, आपल्या परिसरातील जंगलाचे रक्षण, पाण्याचे प्राकृतिक स्रोत टिकवून ठेवण्याचे काम मी सुरूच ठेवले, असे विरेंद्र सांगतात. लोकांचा विचार बदलणे कठीण असते हे लक्षात घेऊन गावातील कामासोबत त्यांनी सायकलवरून सफरही सुरू केली. २००७ मध्ये त्यांनी दुर्ग जिल्ह्यापासून नेपाळपर्यंतची यात्रा केली. दहा लोकांनी त्याला साथ दिली. त्यानंतरच्या वर्षी आपल्या अकरा सहकाऱ्यांना घेऊन विरेंद्र यांनी छत्तीसगढची भ्रमंती केली. लोकांपर्यंत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. पंधरहा हजार शाळकरी मुलांची सोबत घेऊन मानवी साळखी आयोजित करून लोकांत जनजागृती केली. गेल्या दहा वर्षांपासून एका खासगी कंपनीत नोकरी करत असताना विरेंद्र यांनी आपल्या गावासह आपसापच्या सार्वजनिक ठिकाणांवर हजारो झाडे लावली. आपल्या पगारातील ठराविक हिस्सा ते पर्यावरण संवर्धनाच्या कामांसाठी खर्च करतात. कधी पर्यावरण रक्षणाविषयीच्या घोषणा देऊन तर कधी शरीरावर पेटिंग करून ते जागृतीसाठी अनोखे फंडे वापरतात. ग्लोबल वॉर्मिंगची भयानक स्थिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अभियान राबवले. एड्स जागरुकता अभियान, साक्षरता अभियान, मतदान जागृती अभियान यातही त्यांनी कार्य केले. आहे. 

तेरा वर्षांपूर्वी गावातील एका कुंडाची सफाई करताना त्याच्या सुधारणेसाठी विरेंद्र यांनी प्रयत्न केले. त्यातून हा जलस्रोत पुर्ववत झाला. या कामासाठी त्यांना सरकारची मदत मदत मिळाली. त्यातून आतापर्यंत ३५ तलाव, २ कुंड, तन्दला नदी आणि अनेक नाल्यांची सफाई केली गेली. लोकांच्या मदतीने विरेंद्र यांनी कांकेर आणि बालोद येथील तलाव, विहिरींच्या संवर्धनाचे काम सुरू ठेवले आहे. जर आपण आपले पारंपरिक जलस्रोत जपले तर भूजल स्तर टिकेल. अन्यथा परिस्थिती बिकट होईल. आगामी काही वर्षात भारताला भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते असेही ते सांगतात. त्यांच्या या कामाला लोकांसह सरकारकडूनही मदत मिळू लागली आहे. रक्षाबंधनाच्या सणावेळी ते वेस्ट मरेटियलपासून राख्या बनविण्याचा उपक्रम राबवतात. 

News-In-Focus