बाबा रामदेव : ग्लोबल स्वदेशी ब्रँडचे निर्माते 

बाबा रामदेव : ग्लोबल स्वदेशी ब्रँडचे निर्माते 

काही वर्षापूर्वी अशी स्थिती होती की, लोकांमध्ये ब्रँड्सची एक क्रेझ असायची. अनेकांना तर जगभरातील टॉप ब्रँड्सची सवयच लागली होती. या गदारोळात स्वदेशी उत्पादनांकडे दुर्लक्ष झाल्याची स्थिती होती. ही उत्पादने आपल्या आरोग्यासाठी चांगली नाहीत असेही मानले जायचे. याच काळात ऑनलाइन शॉपिंग आणि ई कॉमर्स कंपन्यांनी मार्केटमध्ये आपला दबदबा कायम केला. अशा स्थितीत एखादा स्वदेशी ब्रँड मार्केटमध्ये टिकणे ही खूप अवघड बाब होती. या सर्व स्थितीवर मात करून पतंजली आयुर्वेदने मार्केटमध्ये आपले पाय रोवले. आपल्या चमकदार कामगिरीने ग्राहकांना ब्रँड्सच्या मोहजालातून बाहेर काढून त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. आजघडीला देशातील एफएमसीजी कंपन्यांमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या पतंजलीने ग्लोबल स्वदेशी ब्रँड म्हणून ओळख बनवली आहे. अर्थात यामागे आहेत आयुर्वेदाचा प्रसार करण्याचे धेय्य असलेल्या बाबा रामदेव यांचे अपार कष्ट. 

25 दिसंबर 1965 रोजी हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यातील सैयद अलीपुर, कस्बा-नांगल चौधरी येथे जन्मलेल्या रामकृष्ण यादव उर्फ बाबा रामदेव यांचा जीवनप्रवास विलक्षण आहे. हरिद्वार येथील गुरुकुल कांगड़ी विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. लहानपणापासूनच योग अभ्यासाची आवड. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर योग प्रसाराला स्वतःला वाहून घेतले. याच काळात आयुर्वेदातील शक्ती आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी योग आणि आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पतंजली योगपीठाची स्थापना केली. उत्तराखंडमध्ये दिल्ली - हरिद्वार नॅशनल हायवेनजीक बहदरबाद, महर्षि दयानन्द ग्राम येथे  योगपीठ सुरू झाले. योग प्रसारासाठी देशभरात त्यांनी कार्यशाळांचे आयोजन केले. शाळांपासून ते बड्या कार्पोरेट कंपन्यांपर्यंत सर्वच ठिकाणी योगाचा प्रसार केला. त्याच दरम्यान त्यांना आयुर्वेदाचे, स्वदेशी वस्तूंच्या उत्पादनाचे महत्त्व जाणवले. त्यासाठी त्यांनी पतंजली ब्रँड अंतर्गत मार्केटमध्ये प्रवेश केला. नैसर्गिक प्रॉडक्ट्स हेच आपला युएसपी आहेत हे जाणून पतंजलीने या वस्तूंची महती लोकांसमोर आणली. मार्केटमध्ये असलेल्या वस्तूंच्या तुलनेत स्वस्त आणि अधिक चांगला दर्जा असलेल्या वस्तूंना लोकांनीही स्वीकारले. पतंजलीने प्रॉडक्ट कॉन्सेप्टला ब्रँडिंगमध्ये बदलले. 

बाबा रामदेव यांनी आपले सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या मदतीने पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीची स्थापना केली. आचार्य बालकृष्ण कंपनीचे सीईओ बनले. पतंजलीने सुरुवातीला आपल्या ग्राहकांवर लक्ष न देता प्रॉडक्ट्सवर भर दिला. त्यांची योग्य पद्धतीने जाहिरात करून ते लोकांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर लोकांमध्ये जाऊन त्यांचा प्रचार केला. स्वदेशी उत्पादने ही बाब पतंजलीने लोकांमध्ये रुजवली. त्यामुळे तुप असो वा टूथपेस्ट. या दोन्ही वस्तू जगभरात वापरल्या जातात. मल्टिनॅशनल कंपन्यांच्या या प्रॉडक्ट्सला पतंजलीने टक्कर दिली. कमी कालावधीत वस्तू लोकांपर्यंत पोहोचवणे हे वैशिष्ट्य कंपनीने टिकवल्याने लोकांमध्ये अधिक रुची वाढली. आपले प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवताना कोणताही ब्रँड अँम्बॅसेडर कंपनीने दिला नाही, याऊलट पतंजली हाच ब्रँड असल्याचे त्यांनी लोकांमध्ये रुजवले. त्यातून लोकांची कंपनीशी कनेक्टिव्हिटी वाढली. कमी किंमतीत मिळणारी उत्पादने लोकांच्या पसंतीला पडू लागली. त्यामुळे तगड्या एफएमसीजी कंपन्यांनाही हे लक्षात आले की पीक मार्जिनवर ग्राहक टिकू शकत नाहीत. तुमचे प्रॉडक्ट योग्य असेल तर त्यासाठी प्रमोशनचीही गरज भासत नाही. मॅगी, टूथपेस्ट, तुप, मध अशा वस्तूंच्या कॅटॅगरीत पतंजलीने एफएमसीजी कंपन्यांवर मात केली. नंतर तर अशी स्थिती आली की सर्वसामान्य लोकच पतंजलीचे ब्रँड अॅम्बॅसेडर बनले. 

2007 मध्ये पतंजली आयुर्वेदची सुरुवात झाली. नंतर अवघ्या दहा वर्षातच कंपनीने अनेक उत्पादनांबाबत बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान दिले. टीव्हीपासून बॅनर्सपर्यंत सर्व ते प्रसिद्धीचे मार्ग कंपनीने स्वीकारले. त्यामुळे 2015-16 मध्ये पतंजली आयुर्वेदची कमाई 5 हज़ार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तर कंपनीने पुढच्याच वर्षी 10 हज़ार कोटींच्या कमाईचे टार्गेट ठेवले. अनेक राज्यांमध्ये कंपनीने नवे प्लान्ट सुरू करून फुड पार्कची निर्मिती केली आहे. 10,000 कोटी रुपये कमाईचे टार्गेट पूर्ण करताना बाबा रामदेव यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून एका सुदृढ, आरोग्यदायी समाजाची निर्मिती हेच आपले उद्दीष्ट असल्याचे सांगितले. भेसळयुक्त आणि बनावट प्रॉडक्टपासून लोकांना वाचवण्याबरोबरच नॅचरल आणि गुणवत्तापूर्ण प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणल्याचे सांगत बाबा रामदेव यांनी बिझनेसमधील आपले साम्राज्य उभे केले. पतंजलीच्या विकासाच्या गतीमुळे नेस्ले, हिंदूस्थान युनिलिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल अशा बड्या एफएमसीजी कंपन्यांनाही हादरवून सोडले. 

एका रिपोर्टनुसार 2021 पर्यंत भारतातील आयुर्वेदिक हेल्थ प्रॉडक्ट्सचे मार्केट 100 कोटी डॉलर्सचे असेल. कारण, ग्राहक आता पर्सनल केअर प्रॉडक्ट्समध्ये नॅचरल आणि ऑर्गेनिक प्रॉडक्ट्सवर भर देतात. त्यामुळे इतर कंपन्यांनाही आयुर्वेदाचा आधार घ्यावा लागला आहे. आकडेवारी पाहिली तर दरवर्षी पतंजलीचा रेव्हेन्यू वाढत चालला आहे. 2009-10 मध्ये कंपनीच्या उत्पादन विक्रीची आकडेवारी 162.67 कोटी रुपये होती. तर पुढच्या चार वर्षात, म्हणजे 2013-14 मध्ये विक्री 1000 कोटी रुपयांवर पोहोचली. 2014-15मध्ये 2006.75 कोटींची विक्री असलेल्या पतंजलीने 2015-16 या वर्षात दुप्पटीहून अधिक म्हणजे 5000 कोटींची उलाढाल केली. आणि 2016 नंतर 10,000 कोटींचा टर्नओव्हर कमी होऊ दिलेला नाही. देशभरात 47,000हून अधिक रिटेल स्टोअर्स आणि 3500 हून अधिक डिस्ट्रीब्यूटर असलेल्या कंपनीने दिग्गजांना घाम फोडला आहे. रुची सोया कंपनीचे अधिग्रहण करून रामदेव बाबांनी शेअर मार्केटमध्ये पाऊल टाकले. भारतातील 18 राज्यांमध्ये कंपनीचे वेअरहाऊस आहेत तर आणखी सहा राज्यांत प्लान्ट प्रस्तावित आहेत. याशिवाय पतंजली अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, रशिया, दुबईसह अन्य युरोपियन देशांमध्येही विस्तारली आहे. पतंजलीने डेअरी प्रॉडक्ट्स, फ्रोजन फुड्स, मिनरल वॉटर, सोलर बिझनेसमध्येही पावले टाकली आहेत. 

आज पतंजलीला एका विशिष्ट स्थानी आणून ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. मात्र, यापासून आम्हाला वैयक्तिक काही मिळवायचे नाही. पतंजलीच्या माध्यमातून जी कमाई होईल ती समाजाच्या कल्याणासाठीच खर्च केली जाईल. देशासाठी काहीतरी करावे असे माझे स्वप्न होते. पतंजलीच्या माध्यमातून लोकांपर्यंत योगा आणि आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, असे बाबा रामदेव सांगतात. एका छोट्या खेडेगावातील साध्या सरकारी शाळेत शिक्षण घेतलेली एखादी व्यक्ती एखादा आंतरराष्ट्रीय ब्रँड तयार करू शकते ही अचाट कामगिरी बाबा रामदेव यांनी केली आहे. 

(Published On 13/09/2020)

News-In-Focus