जिद्दीच्या प्रवासातून स्वप्नपूर्ती : धिरुभाई अंबानी
मोठी स्वप्ने पहा, कारण मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने पूर्ण होतात... हे उद्गार आहेत. धिरुभाई अंबानी यांचे. धिरजलाल हिरालाल अंबानी अर्थात धिरुभाई यांनी पकोडे विक्रीपासून पेट्रोल पंपावर काम करण्यापर्यंत केलेल्या अविरत कष्टातून एक प्रसिद्ध उद्योजकाचा उदय झाला. 1966 मध्ये त्यांनी रिलायन्स टेक्स्टाइलची स्थापना केली. अवघ्या तीनशे रुपये पगारावर काम करणाऱ्या धिरुभाई यांच्या मृत्यूसमयी त्यांची संपत्ती 62 हजार कोटी रुपयांहून अधिक होती. मेहनत, प्रामाणिकपणा या गुणांसोबतच धेय्यवादी प्रेरणेने काम करणारे धिरुभाई युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वच ठरले. भारतीय शेअर मार्केटमधील कुरघोडीच्या राजकारणाला मात देणारी व्यवहारी प्रवृत्ती त्यांनी जोपासली. हा त्यांचा गुण विलक्षण होता.
गुजरातमथधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावामध्ये 28 डिसेबर 1932मध्ये धिरजलाल हिरालाल अंबानी यांचा जन्म झाला. वडिल हिरालाल हे शिक्षक तर आई जमनाबेन गृहिणी होत्या. धिरुभाई यांना चार भाऊ-बहिण होते. मोठे कुटूंब असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करतच त्यांना बालपण घालवावे लागले. शिक्षण अर्धवट सोडून वडिलांना मदतीसाठी त्यांनी काम सुरू केले. फळे, नाष्टा विक्रीपासून ते मंदिरांसमोर पकोडे विक्रीचेही काम त्यांनी केले. मात्र, यश येत नसल्याने वडिलांच्या सल्ल्यानुसार नोकरीही स्वीकारली. मोठे बंधू रमणिकभाई यांच्यासोबत येमेन येथे जाऊन त्यांनी दरमहा 300 रुपये पगारावर पेट्रोल पंपावर काम केले. मात्र, त्यांचा ओढा व्यापाराकडेच होता.
1950 च्या सुमारास धिरुभाई तेथून भारतात परतले. चुलत भाऊ चंपकलाल दमानी यांच्यासोबत पॉलिस्टर धागे आणि मसाल्यांच्या आयात-निर्यात व्यापाराला त्यांनी सुरुवात केली. मस्जिद बंदरवरील नरसिंहा स्ट्रीटवरील एका छोट्या कार्यालयात रिलायन्स कमर्शिअल कार्पोरेशनची स्थापना झाली. यादरम्यान अंबानी परिवार मुंबईतील भुलेश्वरमध्ये जय हिंद इस्टेटमधील एका छोट्या अपार्टमेंटमध्ये रहायला होता. 1965 मध्ये चंम्पकलाल दमानी यांच्यासोबतची व्यावायिक भागिदारी धिरुभाईंनी संपुष्टात आणली. त्यांनी सूत व्यापाराला सुरुवात केली. एका छोट्या दुकानापासून हा व्यवसाय सुरू करणारे धिरुभाई स्वतःच्या हिंमतीवर बाँम्बे सूत व्यापारी संघटनेचे संचालक बनले. या व्यवसायातील संधी हेरून 1966 मध्ये त्यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील नरोडामध्ये कापड मिल सुरु केली. इथूनच विमल ब्रँडची सुरुवात झाली. आपले मोठे बंधू रमणिकलाल अंबानी यांचा मुलगा विमल याच्या नावावरून ब्रँडला हे नाव दिले गेले. या ब्रँडचा विस्तार त्यांनी भारतभर केला. त्यामुळे हा ब्रँड एक घराघरात पोहोचला.
1980 च्या दशकात त्यांनी पॉलिस्टर फिलामेंट यार्न उत्पादनाचे लायसन्स सरकारकडून मिळवले. इथून धिरुभाईंसाठी सफलतेचे दार उघडले. 1977 मध्ये जेव्हा रिलायन्सने आयपीओ जारी केला तेव्हा 58,000 हून अधिक गुंतवणूकदारांनी त्यात आपला इंटरेस्ट दर्शविला. पेट्रोलियम, दूरसंचार, ऊर्जा, वीज, टेक्स्टाइल, मूलभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात त्यांनी रिलायन्सचा विस्तार केला. ज्याला 1991 च्या मुक्त अर्थव्यवस्थेचा काळात त्यांची दोन्ही मुले मुकेश आणि अनिल यांनी नव्या मार्गाने नेले. अवघ्या काही रुपयांत सुरु झालेल्या या कंपनीमध्ये 2012 मध्ये 85000 कर्मचारी झाले. जगातील 500 सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश झाला. आशियातील टॉप 50 उद्योजकांच्या यादीतही धिरुभाई यांना स्थान मिळाले.
कोकिलाबेन यांच्याशी विवाह केलेल्या धिरुभाई यांना मुकेश आणि अनिल ही दोन मुले आणि नीना कोठारी, दिप्ती साळगावकर या दोन मुली. 1998 मध्ये पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठाने त्यांना डीन मेडल देऊन गौरविले. 1996, 1998 आणि 2000 मध्ये आशियातील टॉप पॉवरफुल 50 उद्योजकांमध्ये त्यांचा समावेश झाला. 1999 मध्ये त्यांना बिझनेसमॅन ऑफ दी इअरचा पुरस्कार मिळाला. भारतातील केमिकल उद्योगाच्या विस्ताराबद्दल मॅन ऑफ दी सेंच्युरी, इकॉनॉमिक टाइम्सचा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. ग्लोबल एशियन अॅवॉर्ड्ससह फिक्कीने त्यांना मॅन ऑफ ट्वेंटिंथ सेंच्युरी अॅवॉर्डनेही गौरविले. हृदयविकाराने धिरुभाई यांचे 6 जुलै, 2002 मध्ये निधन झाले. मात्र, नव्वदच्या दशकात आपल्या कर्तृत्वाने त्यांनी अनेक मानसन्मान मिळवले.
शेअर मार्केटमधील दबदबा
धिरुभाईंनी चाणाक्षपणाने कोलकात्तामधील शेअर दलालांनाही चाप लावण्याचे काम केले होते. त्यांच्या व्यापारी चतुराईमुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजही अडचणीत आला होता. 18 मार्च 1982 मधील ही घटना. जेव्हा कोलकात्तामधील काही मारवाडी शेअर दलालांनी रिलायन्स टेक्स्टाइल इंडस्ट्रीजचे साडेतीन लाख शेअर्सची धडाधड विक्री सुरू केली. त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत 131 रुपयांवरून घसरून 121 रुपयांवर आले होते. यापेक्षा अधिक किंमत घसरून खालच्या स्तरावर शेअर पुन्हा खरेदी करण्याचा प्लॅन या व्यापाऱ्यांनी केला होता. धिरुभाई् अंबानी हे नवे उद्योजक असल्याने दलालांनी आपला प्लॅन यशस्वी करण्यासाठी ही खेळी केली. मात्र, याबाबत अंबानी यांना माहिती मिळताच, त्यांनी आपल्या दलालांना शेअर्स विकत घ्यायला सांगितले. त्यामुळे मार्केटचे सत्र संपताना शेअरची किंमत 125 रुपयांवर आली. पुढच्या काही दिवसांत हाच प्रकार सुरू राहिला. परिणामी शेअरची किंमत घसरण्याऐवजी वाढली. या दिवसांत रिलायन्स टेक्स्टाइल इंडस्ट्रीजच्या एकूण 11 लाख शेअर्सची विक्री झाली. त्यापैकी 8 लाख 57 हजार शेअर्स अंबानी यांच्या दलालांनीच खरेदी केले. त्यामुळे कोलकात्तामधील दलालांचे धाबे दणाणले. शुक्रवारी सेटलमेंटसाठी अंबानी यांच्या दलालांनी शेअर मागितले. वायदा व्यापार असल्याने विक्री करणाऱ्या दलालांकडे शेअर्स नव्हते. त्यामुळे 131 रुपयांवर शेअर विक्री करणाऱ्या दलालांची कोंडी झाली. जर खरे शेअर्स द्यायचे झाले तर या दलालांना ते चढ्या दराने खरेदी करावे लागले असते. आणि जर या ट्रॅन्झॅक्शनसाठी मुदत मागितली असती तर प्रति शेअर 50 रुपये द्यावे लागले असते. विक्री करणाऱ्या दलालांनी ट्रॅन्झॅक्शनसाठी मुदत मागितली. मात्र, धिरुभाई यांच्या दलालांनी त्यास इन्कार केला. त्यामुळे कोलकात्तामधील दलालांना ज्या दरावर मिळतील, त्या दरावर रिलायन्स टेक्स्टाइल इंडस्ट्रिजचे शेअर्स खरेदी करावे लागले. तीन दिवस अशी स्थिती होती की स्टॉक मार्केट सुरु झाल्यावरच बंद होऊ लागले. परिणामी रिलायन्सच्या शेअर्सची किंमत भरमसाठ वाढली. 18 मार्च,1982 रोजी सुरू झालेला हा प्रकार 10 मे, 1982 रोजी संपला. या काळात धिरुभाई स्टॉक मार्केटमधील मसिहा बनले. गुंतवणूकदारांच्या विश्वासाची पूर्तता या एकाच गोष्टीच्या बळावर धिरुभाई बिझनेस महाराजा बनले. या विश्वासाच्या बळावर नव्वदीच्या दशकात त्यांनी आपल्यासोबत 24 लाख गुंतवणूकदार जोडले.
(Published On 09/01/2021)