तरुणीचे स्वदेशी स्टार्टअप, बनवली बारा हजार शेततळी

तरुणीचे स्वदेशी स्टार्टअप, बनवली बारा हजार शेततळी

देशातील शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची. मात्र पावसाची अनिमयमितता आणि कमकरता यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाचे पाणी साठवण्यासाठीची साधनेही नाहीत. त्यामुळे अनेकवेळा मुसळधार पावसात गावे पुरात बुडतात आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याविना तडफडतात. शेतकऱ्यांची ही समस्या पाहून महाराष्ट्रातील एका युवतीने स्वदेशी स्टार्टअपचे असे मॉडेल विकसित केले, त्यातून तब्बल बारा हजार शेततळी उभी राहिली आहेत. हजारो शेतकऱ्यांना यातून मदत मिळाली आहे. मुंबईत राहणाऱ्या मैथिली अप्पलवार या तरुणीच्या जिद्दीच्या प्रवासाची ही कहाणी. 

एका व्यावसायिक कुटूंबातून आलेल्या मैथिलीने अमेरिकेत जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून आपले शिक्षण पूर्ण केले. एका रिसर्च प्रोजेक्टसाठी तिला यवतमाळ येथे राहण्याची संधी मिळाली. यवतमाळसारख्या ठिकाणी रहाणे हा मुंबई, अमेरिका अशी वारी करणाऱ्या मैथिलीसाठी वेगळाच अनुभव होता. तिथे राहिल्यावर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रथमच मैथिलीला समजल्या. छोट्या - छोट्या सुविधांसाठी शेतकऱ्यांना कसा संघर्ष करावा लागतो हे तिने पाहिले. “यवतमाळमध्ये मला लक्षात आले की आपली एखादी छोटीशी मदतही शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर करू शकते. त्यामुळे मी ठरवले की शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रात सुधारणा करून शेतकऱ्यांसाठी आपल्याला काही चांगली गोष्ट घडवता येईल. मी पाहिले की सर्वात मोठी अडचण पाण्याची आहे. पाणी साठवण्याची कोणतीही स्वस्त सुविधा त्यांच्याकडे नाही. त्यावर आपल्याला काम करता येईल असे वाटले” असे मैथिली सांगते. 

मुंबईत परतल्यावर 2016 मध्ये तिने आपली स्टार्टअप कंपनी अवाना सुरू केली. त्यावेळी प्रथम शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि टिकावू शेततळी तयार करण्यासाठीच्या वस्तूंवर लक्ष केंद्रीत केले. मैथिलीने आपला स्टार्टअप जलसंचय लाँच केला. हा एक कृत्रिम तलाव आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये पहिल्यांदा खड्डा खोदला जातो. नंतर त्यावर एक पॉलिमर शीट बसवली जाते. पावसाचे पाणी अथवा नाला, नदीतून वाहून येणारे जादा पाणी या तलावात साठवले जाते. नंतर शेतकरी याचा वापर शेतासाठी करू शकतात. “सध्या आम्ही अशा कपॅसिटीचे तलाव बनवतो की जे ५०-६० लाख लिटर पाणी साठवतात. त्यांचा वापर साधारणतः ५ एकर शेतासाठी होऊ शकतो. या तलावासाठी येणारा खर्च २ लाख १५ हजार इतका आहे. मात्र सिमेंट टँक बसवण्यापेक्षा ही रक्कम अतिशय कमी आहे. कारण शेतकऱ्यांना एकाचवेळी १० ते २० लाख रुपये जमवणे अतिशय अवघड गोष्ट असते,” असे त्यांनी सांगितले. 

अशा प्रकारचे जलसंचय तलाव बनवल्यानंतर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत खूपच सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांची कमाई ९८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे त्या सांगतात. जे शेतकरी फक्त एकाच हंगामात पिक घेऊ शकत होते, ते पाण्याच्या उपलब्धतेमुळे तिन्ही हंगामात शेती करतात. अनेकजण आपल्याकडील पूर्ण जमिनीत शेती करू शकत नव्हते. कारण, त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नव्हती. आता ही समस्या संपली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची समस्या आहे, अशा ठिकाणीच मैथिली पोहोचली. नंतर काही शेतकऱ्यांनी अशा तलावांमध्ये मत्स्य पालन, मोती उत्पादन सुरू केले. औरंगाबाद येथील परमेश्वर कांबळे असोत वा सातारा येथील दुधानवाडीचे बहूसंख्य शेतकरी. अशा तलावांमुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे. एक वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. शेततळ्यांच्या प्रोजेक्टनंतर मैथिली यांनी पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लक्ष केद्रीत केले. दुधाळ जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा जिन्स बॅग्जऐवजी पर्यावरणपूरक बॅगा तयार केल्या गेल्या. या बॅग शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बॅग्जपेक्षा स्वस्त आणि टिकावू असल्याने काही दिवसातच ४० हजार बॅग्जची विक्री झाली. 

स्वतःच्या कुटूंबाचा बिझनेस असल्याने मैथिली यांना स्टार्टअपसाठी निधी मिळवण्यात अडचणी आल्या नाहीत. मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आपले म्हणणे त्यांना पटवून देणे, त्यांच्यामध्ये नव्या गोष्टींसाठी जागृती करणे ही खूपच अडचणीची गोष्ट ठरली. या क्षेत्रात जादा महिला दिसत नाहीत. एखादी मुलगी तुमच्यासाठी काही करत आहे हे लोकांना सहजपणे स्वीकारणे अवघड जाते असा अनुभव मैथिली यांना आला. आगामी काळात मैथिला आपल्या अवाना या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणखी काही प्रॉडक्ट्स लाँच करणार असल्याचे त्या सांगतात. ग्रामीण भारतासाठी मैथिली यांचा स्टार्टअप प्रेरणादायी आहे. 

News-In-Focus