हजारो देशवासियांना नवी ‘दृष्टी’ देणारे डॉ. राव 

हजारो देशवासियांना नवी ‘दृष्टी’ देणारे डॉ. राव 

हैदराबाद येथील एलव्हीपीईआयचे संस्थापक डॉ. गुलापल्ली नागेश्वर राव यांना नुकताच दी आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अॅवार्डअंतर्गत एंड ब्लाइंडनेस २०२० च्या प्रतिष्ठित ग्रीनबर्ग पुरस्कारासाठी निवडले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहयोगाने दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी एलव्ही प्रसाद नेत्र संस्थेने (एलव्हीपीईआय) केलेले कार्य अतुलनीय आहे. ग्रीनबर्ग पुरस्कार अंध व्यक्तींना दृष्टी देण्यासाठी जगभगात सुरू असलेल्या कार्यासाठी प्रोत्साहन म्हणून दिला जातो. सामूहिक कौशल्य आणि संशोधनाचा योग्य वापर केला जावा अशी यामागील भूमिका आहे. तीन मिलियन डॉलरच्या या पुरस्कारासाठी केली जाणारी निवड या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन केली जाते. 

डॉ. गुलापल्ली नागेश्वर राव यांच्या एलव्हीपीईआयचे देशभरात शेकडो तपासणी, उपचार केंद्रे आहेत. ज्यातून १५ मिलियनहून अधिक जणांवर उपचार करण्यात आले आहेत. प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ गोविंदप्पा वेंकटस्वामी यांचा मुलगा असलेले डॉ. नागेश्वर राव. गोविंदप्पा यांनी गरीबांवरील उपचारासाठी चेन्नईत अरविंद नेत्र चिकित्सालयाची स्थापना केली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत डॉ. राव यांनी नेत्रतज्ज्ञ बनण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये या क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी ऑप्थेल्मोलॉजीमध्ये (नेत्र विज्ञान) पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर 1974 मध्ये ते अमेरिेकेत शिक्षणासाठी गेले. बोस्टनमधील टफ्ट्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन आणि रोचेस्टर स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. परदेशात प्रशिक्षण घेण्यासोबतच त्यांनी अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया, आशियातील काही विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणूनही काम केले. 

कार्निया, आय बँकिंग, कार्निया ट्रान्सप्लान्ट, आय केअर पॉलिसी आणि प्लॅनिंग या विषयात डॉ. राव तज्ज्ञ आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ३०० हून अधिक निबंध प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय, अनेक संस्थांच्या संपादक मंडळातही त्यांनी काम केले आहे. 

डॉ. राव 1981 मध्ये पत्नीसह भारतात परतले. हैदराबादमध्ये नेत्र रुग्णालय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. रुग्णांची देखभाल, उपचार आणि संशोधनाला प्रोत्साहन हे मुख्य उद्दीष्ट ठेऊन त्यांनी प्रयत्न सुरू केले. ऑप्थॅल्मिक कार्पोरेशनला त्यांनी आपली सर्व कमाई देऊन राज्याचे तत्कालीन मंत्री एन. टी. रामाराव यांच्याकडे शैक्षणिक संस्थेसाठी जमिनीची मागणी केली. जमीन मिळाल्यावर त्यांनी पब्लिक हेल्थ आणि ऑप्टोमॅट्रीक एज्युकेशन विभाग सुरू केला. 1985 मध्ये प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांचा मुलगा रमेश प्रसाद यांनी त्यांना 5 कोटी रुपये आणि 5 एकर जमीन दिली. येथे त्यांनी एलव्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट सुरू केली. 

इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेसचे माजी महासचिव आणि सीईओ म्हणून काम केलेल्या डॉ. राव यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने नेत्रहीन रुग्णांसाठी संशोधन सुरू केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2002 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानीत केले. तर 2017 मध्ये लॉस एंजिलिसमध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीच्या परिषदेत त्यांना ऑप्थॅल्मोलॉजी हॉल ऑफ फेम यादीत सन्मानित करण्यात आले. गेल्या तीन दशकांत अवघ्या 57 जणांना या यादीत स्थान मिळवता आले आहे. डॉ. राव एलव्हीपीईआयच्या तीन हजार सदस्यांच्या साथीने मिळालेल्या या ग्रीनबर्ग पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करतात. 

News-In-Focus