'गुंतवणूक शास्त्राचे जनक' अर्थात बेंजामिन ग्रैहॅम

'गुंतवणूक शास्त्राचे जनक' अर्थात बेंजामिन ग्रैहॅम 

    भौतिकशास्त्रात ज्याप्रमाणे आयझॅक न्यूटन यांचे किंवा खगोलशास्त्रात जसे गॅलिलिओ यांचे स्थान आहे, तसेच अढळ स्थान गुंतवणुकीच्या शास्त्रात बेंजामिन ग्रैहॅम यांचे आहे. ग्रैहॅम यांना गुंतवणुकीच्या दुनियेत अत्यंत आदराने  'गुंतवणूक शास्त्राचे जनक' किंवा 'डीन ऑफ वॉल स्ट्रीट' असे संबोधले जाते. त्यानी दोन पुस्तके लिहीली, ही दोन पुस्तके म्हणजे गुंतवणूक शास्त्रातील पवित्र ग्रंथ मानले जातात. ती पुस्तके म्हणजे 'सिक्यूरिटी एनालिसिस' आणि 'द इंटलिजंट इन्वेस्टर' ही होय. जगभरातील गुंतवणूकदार या पुस्तकांची पारायणे करतात. ग्रैहम यांचे गुंतवणुकीचे विचार हे  गुंतवणुकदाराचे मनस्थिती, कमीत कमी कर्ज, चांगल्या शेअर्सची दीर्घकाळ गुंतवणूकीसाठी निवड, गुंतवणूकितील मुलभूत संशोधन, सुरक्षित जोखीम अशा विविध बाबींचा समग्र विचार होय. 

    बेंजामिन ग्रैहॅम यांचा जन्म ९ मे १८९४ रोजी लंडन येथे झाला. त्यांचे खरे नाव ग्रॉसबॉम असे होते, लहानपणापासूनच त्यांना त्यांचे नाव फारसे आवडत नव्हते, म्हणून त्यांनी तरुणपणी आपले ग्रॉसबॉम हे नाव बदलून ग्रैहॅम असे वॉल स्ट्रीटच्या संस्कृतीत शोभून दिसेल, असे नाव धारण केले. बेंजामिन ज्यावेळी एक वर्षाचे होते, तेंव्हाच त्याच्या आई-वडिलांनी इंग्लंडमधून अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात स्थलांतर केले. लहानपणीपासूनच बेंजामिन ग्रैहम एक चाणाक्ष आणि असाधारण बुद्धिमत्ता असणारा विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. कोलंबिया विश्वविद्यालयातून त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. १९१४ मध्ये वयाच्या केवळ २० व्या वर्षी त्यांनी पदवी संपादन केली आणि विशेष म्हणजे त्याच वर्षी त्यांना एका शाळेत शिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले. परंतु त्यांनी ही नोकरी करण्यास स्पष्ट नकार दिला, त्यांच्या डोक्यात त्यावेळी दुसरेच विचार सुरु होते. 

    दरम्यान, त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घरची पूर्ण जबाबदारी तरुण ग्रैहॅम यांच्यावर येऊन पडली होती. त्यांची घरची परिस्थिती फारच बिकट झाली होती, म्हणून त्यांना अशा नोकरीची गरज होती जिच्यातून त्यांच्या घराचा संपूर्ण खर्च निघू शकेल.म्हणूनच त्यांनी अमेरिकन शेअर बाजार वॉल स्ट्रीटचा रस्ता धरला. त्याठिकाणी त्यांनी न्यूबर्गर, हेंडरसन - लोएब फर्ममध्ये काम करण्यास प्रारंभ केला. त्यांना त्यावेळी आठवड्याला १२ डॉलर इतके वेतन मिळत होते.  बेंजामिन ग्रैहॅम त्यावेळी धनादेशाची देवाण - घेवाण आणि फर्ममधील अन्य हिशोबाची कामे करत होते. कंपन्याच्या विश्लेषणाचे काम त्यांनी त्याअगोदरच सुरु केले होते. त्यांचा गुंतवणुकीतील व्यासंग आणि अभ्यास बघून अल्पावधीतच म्हणजेच वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना काम करत असलेल्या फर्ममध्येच 'भागीदार' म्हणून प्रमोशन मिळाले. 

    १९२३ मध्ये त्यांनी ग्रैहॅम -न्यूमन भागीदारीची मुहूर्तमेढ रोवली आणि गुंतवणूक क्षेत्रातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली. या कंपनीत त्यांनी त्यांचा माजी विद्यार्थी वॉरेन बफेट याला सोबत घेतले. १९२८ पासून त्यानी कोलम्बिया विश्वविद्यालयात गुंतवणुक विषयावर शिकवण्यास सुरुवात केली. काही काळ माजी विद्यार्थी डेविड डॉड सोबत काम केल्यानंतर ग्रैहॅम यांनी वर्गात शिकवलेल्या अभ्यासाचे 'सिक्युरिटी एनालीसीस' पुस्तक प्रकाशित करण्यात आले. हे सर्व काम डॉडने केले. हे पुस्तक १९३४ मध्ये प्रकाशित झाले आणि बघता बघता या पुस्तकाच्या १० लाख प्रती हातोहात संपल्या. ग्रैहॅम यांनी कोलम्बिया विश्वविद्यालया बरोबरच अंडरसन स्कूल ऑफ मेंनेजमेंट आणि लॉस एंजेलीस स्थितः कॅलिफोर्निया विद्यापीठात ही शिकवण्यास सुरुवात केली होती. 

    ग्रैहॅम यांचे वैशिष्ट्य म्हणजे शेअर बाजारात ते आपली ग्राहकांना अत्यंत कमीत कमी जोखमीमध्ये चांगले पैसे मिळवून देत असत. ग्रैहॅम यांनी सुरक्षित आणि यशस्वी गुंतवणुकीचे मार्ग शोधले होते आणि त्यांनी ते गुंतवणूकदारांना शिकवले होते. सध्याचे यशस्वी गुंतवणूकदारदेखील ग्रैहम यांनी दाखवलेल्या रस्त्यावरूनच जात आहेत. ग्रैहॅम यांनी त्यावेळी कंपन्यांचे अत्यंत खोर विश्लेषण करून त्या आधारावर त्यांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. ज्या मतांची जगभरातील गुंतवणूकदारांनी अमलबजावणी करून लाखो गुंतवणूकदार श्रीमंत झाले. ग्रैहॅम यांनी आपल्या दीर्घ अनुभवातून गुंतवणुकीचे काही आडाखे बांधले होते आणि त्यातून त्यांनी गुंतवणूकीचा यशस्वी कानमंत्र जगाला दिला. 

    गुंतवणुकीच्या दुनियेत ग्रैहॅम यांचे कार्य वादातीत आहे. सिक्यूरिटी एनालिसिस'ला व्यवसायाचे स्वरूप देण्याचे महान कार्य ग्रैहॅम यांचेच आहे. आजच्या पिढीला ग्रैहॅम यांची ओळख वॉरेन बफेट यांचे गुरु अशीच आहे, पण एवढच नाही ते एक ख्यातनाम लेखकही होते. त्यांची 'सिक्यूरिटी एनालिसिस' आणि 'द इंटलिजंट इन्वेस्टर' ही पुस्तके प्रचंड गाजली. आजही ही पुस्तके गुंतवणूकदारांसाठी पथदर्शक समजली जातात. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी कंपन्यांचे आर्थिक विश्लेषण करण्याचा पायंडा जगात सर्वात प्रथम ग्रैहॅम यांनीच पाडला. अमेरिकेतील सिक्यूरिटी कायदा १९३३ च्या निर्मितीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कायद्यामुळे कंपन्यांना स्वतंत्र लेखापालामार्फत कंपनीचे लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध करणे बंधनकारक बनले. यामुळे ग्रैहम यांचे काम अधिक सोपे मात्र कौशल्यपूर्ण बनले आणि त्याचा त्यांना खूप फायदाही झाला. परंतु १९२९ मध्ये आलेल्या जागतिक महामंदीमध्ये शेअर बाजार कोसळला आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या 'ग्रेट डिप्रेशन'चा तडाखा ग्रैहम यांनाही बसला. त्यामध्ये त्यांचे प्रचंड नुकसान झाले. गुंतवणुकीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रैहॅम यांना मिळालेला हा मोटा धडा होता, यातूनच पुढे 'सिक्यूरिटी एनालिसिस' या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकात त्यांनी गुंतवणुकीतील बारकावे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे मार्ग दाखविले आणि त्यामुळेच जगभरातील गुंतवणूकदारांसाठी हे पुस्तक आजही तितकेच उपयुक्त समजले जाते. 

    ग्रैहॅम यांच्या मतानुसार शेअर बाजार हा तुमचा व्यावसायिक भागीदार आहे, जो आपल्याला आपल्या इच्छेनुसार दररोज शेअर खरेदी आणि विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देतो. या काल्पनिक व्यक्तिरेखेला ग्रैहॅम 'मि. मार्केट' या नावाने संबोधित करतात. आपण एक गुंतवणूकदार म्हणून 'मि. मार्केट'ला आपण आपल्याला योग्य किंमत असेल तर खरेदी करू शकतो किंवा त्याची विक्री करू शकतो अन्यथा त्याच्यापासून तटस्थ ही राहू शकतो. कारण दुसऱ्या दिवशी 'मि. मार्केट' तुमच्यासाठी आणखी चांगली गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देऊ शकतो आणि असं नेहमी होत. यालाच गुंतवणुकीच्या परिभाषेत 'युज मार्केट' मानसशास्त्र असे म्हणतात. ग्रैहम यांच्या मतानुसार व्यावसायिक गुंतवणूकदारांच्या तुलनेत सामान्य गुंतवणूकदाराकडे 'नाही' म्हणण्याची ताकद असते आणि तीच त्याच्यासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट आहे. कारण व्यावसायिक गुंतवणूकदारांना शेअर बाजार कुठल्याही पातळीवर असू देत त्यांना गुंतवणूक करणे अनिवार्य असते. सामान्य गुंतवणूकदार मात्र त्याला योग्य वाटेल त्यावेळी गुंतवणूक करू शकतो किंवा गुंतवणूक काढून घेऊ शकतो.  

    ग्रैहॅम यांनी गुंतवणुकीत सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मतानुसार एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तो शेअर त्याच्या अगदी खालच्या पातळीवर खरेदी केला पाहिजे. जेणेकरून जर त्या शेअरमध्ये कितीही चढ-उतार आले तरी गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे,  त्याला त्याच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण घेणारा शेअर खरोखरच चांगला आहे का ? त्याची असलेली किंमत, त्याचे भांडवली मूल्य, तरलता, कर्ज आणि उत्पन्न याचा योगर ताळमेळ असणाऱ्या कंपनीचीच निवड करण्यावर ग्रैहॅम यांनी सदैव भर दिला. त्यामुळेच त्यांना 'गुंतवणूक शास्त्राचे जनक' म्हणून ओळखले जाते.
(Published On 15/02/2020)

News-In-Focus