गुंतवणूकदारांचा ‘आयडॉल’...वॉरेन बफेट

गुंतवणूकदारांचा ‘आयडॉल’... वॉरेन बफेट

    गुंतवणूक क्षेत्रात काम करणार्या लोकांना वॉरेन बफेट हे नाव माहीत नाही,असे म्हणणे धाडसाचे होईल. वॉरेन बफेट यांना शेअर बाजाराच्या दुनियेतील ‘स्टार’ गुंतवणूकदार म्हणून जगभर ओळखले जाते. शेअर मार्केटमधील यशाचे दुसरे नाव आहे वॉरेन बफेट. बफेट यांच्या शेअर मार्केटमधील यशाने अख्ख्या जगाला भुरळ घातली आहे. 

    वॉरेन एडवर्ड बफेट यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 मध्ये अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा शहरात झाला. त्यांचे वडील हॉवर्ड बफेट हे व्यवसायाने स्टॉक ब्रोकर होते. ते नंतर अमेरिकन संसदेत सिनेटर म्हणूनही निवडून गेले. वडील  व्यवसायाने स्टॉक ब्रोकर असल्याने वॉरेन यांना लहानपनापासूनच शेअर मार्केटची आवड होती. आपल्या वडिलांच्या कार्यालयात फळ्यावर खडूने शेअरच्या किंतमी लिहीण्यात त्यांना खूपच आनंद वाटायचा. त्यातूनच हळूहळू छोट्याशा वॉरेनला शेअर बाजाराची गोडी लागली. असं म्हटलं जात की, वॉरेन लहान असताना आपल्या मित्राला म्हटला होता की, जर मी वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत करोडपती झालो नाही तर मी ओमाहामधील सर्वात उंच इमारतीवरून उडी मारणार. 

    वॉरेनने वयाच्या 11 व्या वर्षी पहिल्यांदा जगातील सर्वात मोठ्या न्यूयॉर्क स्टॉक मार्केटमध्ये आपले पाय ठेवले व त्यानंतर त्याने रोवलेले पाय आपल्या अभ्यासपूर्ण गुंतवणूकीच्या जोरावर आजतागायत घट्ट रोवले. न्यूयॉर्क स्टॉक मार्केटमध्ये  त्याने आपल्याजवळ असणार्या थोड्याशा पैशातून सीटीज् सर्व्हिस प्रीफर्ड ़(तेल आणि वायू कंपनी) कंपनीचे सहा शेअर्स विकत घेतले. त्यातील तीन शेअर्स स्वत:साठी आणि उरलेले तीन बहीण डोरीसला दिले. 192930 मध्ये आलेल्या जागतिक महामंदीने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जोरदार हादरे दिले. वॉरेनचा जन्म ही महामंदीच्या काळातच झाला. नेब्रास्काची स्थिती ही यापेक्षा वेगळी नव्हती. महामंदीमुळे नेब्रास्कावरही वाईट परिणाम झाला होता. रोजगार घटले होते, उलाढाल ठप्प झाली होती. सर्वत्र अस्थिरता दिसत होती. 

    महामंदीचे चटके सोसतच वॉरेन मोठा होत होता. त्यामुळे साहजिकच वॉरेनला पैशाची चांगली किंमत आणि ताकदही समजली होती. त्यामुळे वयाच्या 13 व्या वर्षीच वॉरेनने नोकरी करण्यास प्रारंभ केला. त्याची पहिली नोकरी होती वृत्तपत्र विक्रेत्याची. 1944 मध्ये ज्यावेळी वॉरेन अवघ्या 14 वर्षांचा होता, त्यावेळी त्याने आपला पहिला इन्कम टॅक्स रिटर्न भरला होता. त्यावेळी वॉरेनची कमाई होती 1 हजार डॉलर्स (सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 70 हजार रूपये).  त्यानंतर त्याने ‘गुंतवणूक शास्त्राचे जनक’ म्हणून ओळखल्या बेंजामिन ग्रॅहॅम यांच्या हाताखाली काम सुरू केले. तत्पूर्वी वॉरेनने काही काळ गुंतवणूक सल्लागार म्हणूनही काम केले. वॉरेनला ते काम खूप आवडत होते, पण ज्यावेळी त्याने सुचवलेले स्टॉक्स्  कोसळायचे, त्यावेळी त्याची  गुंतवणूकदारांच्या रोषाला सामोरे जाताना चांगलीच पंचाईत व्हायची. हे टाळण्यासाठी वॉरेन यांनी नामी शक्कल लढवली. आता त्याने काही खास मित्र, पैपाहुणे, कुटूंबीय यांच्याशीच भागीदारीत व्यवसाय सुरू केला. पण याठिकाणी वॉरेनला गुंतवणूकीसंबंधी काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या म्हणजे वॉरेनने केवळ 100 डॉलर्सचीच गुंतवणूक करायची आणि पुन: गुंतवणूकीच्या माध्यमातून भागीदारीत स्व:ची हिस्सेदारी वाढवायची. जर केलेल्या एकूण गुंतवणूकीवर 4 टक्क्यांपैक्षा जास्त नफा झाला तर वॉरेनला एकूण भागीदारीमधील निम्मी भागीदारी मिळेल आणि जर का नुकसान झाले तर त्याची एक चतुर्थांश भागीदारी कमी होणार होती. 

    वॉरेन ज्यावेळी 15 वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने 2 हजार डॉलर्सची कमाई केली होती. त्याने नेब्रास्कामध्ये तब्बल 40 एकर शेती विकत घेतली होती आणि शेतीच्या देखभालीसाठी एक मजुर ठेवला होता. शेतातून मिळणार्या पैशातून वॉरेन याने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नेब्रास्का विश्वविद्यालयातून त्याने सायन्सची पदवी घेतली. त्यानंतर त्याने हॉवर्ड बिझीनेस स्कूलमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. हॉवर्ड बिझीनेस स्कूलमध्ये त्याला प्रवेश न मिळाल्याने त्याने आपला मोर्चा कोलंबिया बिझीनेस स्कूलकडे वळविला. ‘कोलंबिया’मध्येच वॉरेनला बेंजामिन ग्रॅहॅम यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. ‘कोलंबिया’मधून पदवी संपादन केल्यानंतर वॉरेन ओमाहाला परतला आणि संभाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याचवेळी तो नेब्रास्का विश्वविद्यालयात गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन करू लागला. 

    1954  मध्ये वॉरेन न्यूयॉर्क मध्ये आले. याठिकाणी त्यांनी बेंजामिन ग्रॅहॅम यांच्या फर्ममध्ये काम सुरू केले. 1951 ते 1956 या काळात वॉरेन यांनी गुंतवणूक सल्लागार आणि विश्लेषक म्हणून नेटाने काम केले. 1956 पर्यंत त्यांच्याजवळ 1 लाख 74 हजार डॉलर्स आणि स्वत:चे घर होते. आता मात्र वॉरेनला वाटू लागलं की आपल्याजवळ इतके पैसे आहेत की आपण आयुष्यभर आरामात  जीवन व्यतीत करू शकतो. या विचारातूनच त्यांनी वयाच्या 26 व्या वर्षीच निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपल्याला वयाच्या 35 व्या वर्षांपर्यंत करोडपती व्हायचे असेल तर मात्र आपल्याला अजून काम करावे लागणार आहे. त्यांचे भविष्यातील भागीदार आणि बर्कशायर हॅथवे कंपनीच्या शेअरधारकांच्या नशिबाने वॉरेन यांनी निवृत्तीचा आपला बेत रद्द केला. हा निर्णयच त्यांना जगातील सर्वात मोठा यशस्वी गुंतवणूकदार बनवू शकला. 

    वॉरेन यांनी 1956 मध्ये बफेट पार्टनरशिप लि. ची मुहूर्तमेढ रोवली. 1964 मध्ये वॉरेन यांनी बर्कशायर हॅथवे कंपनीवर ताबा मिळवला. वॉरेन यांचा हा आजपर्यंतचा सर्वात महत्वाचा व्यवहार होता. बर्कशायर हॅथवे 1830 च्या दशकात व्हॅली फॉल्स् कंपनी नावाने स्थापन झाली होती. वस्त्रोद्योगातील अग्रगण्य कंपनी म्हणून व्हॅली फॉल्स् कंपनीचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता. 1929 साली कंपनीचे नाव बदलून बर्कशायर फाईन स्पिनिंग असोसिएटस् असे ठेवण्यात आले. 1955 साली ही कंपनी हॅथवे मॅन्युफॅक्चरिग कंपनीमध्ये विलीन झाली. या विलिनीकरणानंतर बर्कशायर हॅथवे कंपनी प्रचंड फायद्यात होती. कंपनीकडे तब्बल 12 हजर कर्मचारी आणि 15 कारखाने होते. 1962 मध्ये वॉरेन बफेट यांनी या कंपनीत पहिल्यांदा गुंतवणूक केली होती. सध्या वॉरेन बफेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहेत. 
(Published On 22/02/2020)

News-In-Focus