म्युच्युअल फंडचा गुरू... जॉन सी. उर्फ ‘जॅक’ बोगल

म्युच्युअल फंडचा गुरू... जॉन सी. उर्फ ‘जॅक’ बोगल

    ‘त्याला’ अख्ख जगं स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून ओळखते...काही लोक त्याला ‘बिझीनेस मॅग्नेट’ ही म्हणतात, तर काही लोक त्याने समाजासाठी केलेले कार्य बघून ‘त्याला’ मानवतावादी कार्यकर्ताही म्हणतात...इतकी सारी विशेषणे ज्या व्यक्तीच्या नावा मागे लागली आहेत त्या व्यक्तीचे नाव आहे जॉन सी. अर्थातच जॅक बोगल... बोगल हा ‘द वेनगार्ड ग्रुप’चा संस्थापक आणि निवृत्त सीईओ आहे. त्याने गुंतवणूकीतील अफाट ज्ञान, सातत्यपूर्ण अभ्यास आणि संशोधनाचा आधार घेवून लिहिलेले ‘कॉमन सेन्स ऑन म्युच्युअल फंड्स : न्यू इम्पेरिटीव्हज् फॉर द इंटिलिजन्ट इन्व्हेस्टर’ या पुस्तकाने जगभरात खपाचे उच्चांक गाठले आहेत. या पुस्तकाला गुंतवणूकदारांच्या दुनियेतील ‘क्लासिक’ पुस्तक म्हणून ओळखले जाते. 

    जॉन (जॅक) बोगल  याचा जन्म  8 मे 1929 रोजी अमेरिकेच्या न्यू जर्सी प्रांतातील वेरोना शहरात झाला. त्यावेळी सुरू असलेल्या महामंदीमुळे त्यांच्या कटूंबाची पुरती वाताहात झाली होती. त्याच्या वडिलांना अक्षरश: घरही विकावे लागले होते. घरची झालेली वाताहात पाहून त्याचा वडिलांना दारूचे व्यसन जडले होते. त्याचे वडील दारूच्या पुरते आहारी गेले होते. त्यातून जॉनच्या आई  वडिलांमध्ये दररोज कडाक्याचे भांडण होत असे. अखेर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आई वडिलांच्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर जॉन आणि त्याचा जुळा भाऊ डेव्हिड याला जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. ते दोघेही शाळेत खूप हुशार होते, पण त्यांच्याकडे  फी भरण्याचेही पैसे नसायचे. त्यांनी आपले शिक्षण शिष्यवृत्तीच्या जोरावर पूर्ण केले आणि त्यानंतर ख्यातनाम अशा ‘ब्लेअर अॅकॅडमी’मध्ये ते दाखल झाले. 

     ‘ब्लेअर अॅकॅडमी’मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना गणितामध्ये विशेष रूची वाटू लागली. या अॅकॅडमीतून जॉन यांनी 1947 साली पदवी संपादन केली. त्यानंतर जॉन यांनी पुढील शिक्षणासाठी प्रिन्सटन विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे जॉन यांनी म्युच्युअल फंड क्षेत्राबाबत अधिक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. या अगोदर म्युच्युअल फंड क्षेत्राबाबत अधिक विस्ताराने कोणीच फारसा अभ्यास केला नव्हता. या ठिकाणी जॉन यांनी एक शोधनिंबध लिहीला, त्याचे नाव होते ‘द इकॉनॉमिक रोल ऑफ द इन्वेस्टमेंट कंपनी’. 1951 मध्ये जॉन बोगल यांनी  प्रिन्सटन विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी पेनसिल्वानिया विद्यापीठात क्लासेस सुरू केले. 

    1951 मध्ये पदव्यूत्तर पदवी घेतल्यानंतर जॉन बोगल यांनी बँकिग आणि गुंतवणूक क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते वेलिंग्टन फंड या कंपनीत रूजू झाले. अल्पावधीत त्यांनी आपल्या गुंतवणूकीतील बुधिद्तमेच्या जोरावर फंड मॅनेजर म्हणून बढतीही मिळवली. 1955 मध्ये त्यांनी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्विकारली. जॉन यांनी कंपनीतील गुंतवणूक विभागाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर जॉन यांनी वेलिंग्टनमधील व्यवस्थापनाला केवळ एका फंडावर ध्यान केंद्रत करण्याऐवजी आणखी एखादा फंड निर्माण करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्याला कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तो नवा फंडच जॉन उर्फ जॅकच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट ठरला. बघता बघता जॉन आपल्या अफाट बुध्दिमतेच्या जोरावर वेलिंग्टन कंपनीच्या चेअरमनपदापर्यंत पोहचले. परंतु वेलिंग्टन फंडबाबत त्यांनी घतलेला विलीनीकरणाचा निर्णय सपशेल अपयशी ठरला आणि त्यांना त्यातून बाहेर पडावे लागले.

    आयुष्यात कितीही अपयश आले तरी बोगल हार माणणार्यातील नव्हता. त्याने 1974 मध्ये वेनगार्ड कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. आज ही कंपनी गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून जगभर ओळखली जाते. 1999 मध्ये फॉर्च्युन मासिकाने बोगल यांचे वर्णन ‘20 व्या शतकातील चार महान गुंतवणूकदारांपैकी एक’ अशा शब्दात केले होते. बोगल याची महती या वर्णनातून अधिक ठळक होते. 1976 मध्ये पॉल सॅम्युएल्सन यांच्या कामाने प्रभावीत होत बोगल यांनी पहिला इंडेक्स इन्वेस्टमेंट ट्रस्टची स्थापना केली. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झालेला हा पहिलाच इंडेक्स म्युच्युअल फंड होता. 

    1990 मध्ये बोगल यांना हृदय विकाराचा त्रास सुरू झाला. ते काही काळ अंथरूणाला खिळून होते. 1996 मध्ये हृदय शस्त्रक्रियेनंतर वेनगार्ड कंपनीचे वरिष्ठ चेअरमन म्हणून पदभार स्विकारला. त्यांची कारकिर्द ऐन बहरात असताना 1999 मध्ये त्यांनी वेनगार्ड कंपनीचा राजीनामा देवून ‘बोगल फायनान्शियल मार्केटस् रिसर्च सेंटर’ची स्थापना केली. इंडेक्स म्युच्युअल फंडची त्यांची संकल्पना गुंतवणूक क्षेत्रात परिवर्तन करणारी ठरली. यामध्ये गुंतवणूक जरी कमी असली तरी त्यात सातत्य ठेवल्यामुळे  ग्राहकांना चांगला परतावा मिळत होता. बोगल मॅनेज्ड फंडपेक्षा इंडेक्स फंड गुंतवणूकीसाठीचा चांगला पर्याय मानत होते. ते त्यांनी गुंतवणूकीतून सिध्दही केले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी सातत्य आणि कॉमन सेन्स या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असल्याचे त्यांचे मत होते. 

    म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी त्यांनी दिलेला महत्वपूर्ण सल्ला...1) कमी किमतीचे फंडस् निवडा. 2)फंडच्या एकूण किंमतीचा अभ्यास करा. 3)केवळ फंडाने मागील वेळी दिलेल्या परताव्यावर गुंतवणूक करणे टाळा. 4) फंडाच्या मागील परफॉरमन्स्चा वापर केवळ गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी विचारात घ्या. 5) शक्यतो ‘नावाजलेल्या’ फंडांपासून सावधच रहा. 6) एकाचवेळी खूप सार्या फंडांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. 7) गुंतवणूकीत सातत्य ठेवा.
(Published On 14/03/2020)

News-In-Focus