डी मार्ट रिटेल स्टोर चेनचे मालक राधाकिशन दमानी

डी मार्ट रिटेल स्टोर चेनचे मालक राधाकिशन दमानी

    भारतीय गुंतवणूक जगतात राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांचे स्थान सर्वात वरचे आहे. ६१ वर्षीय दमानी यांना भारतातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी रिटेल स्टोर चेन 'डी मार्ट'चे मालक म्हणून अख्खा देश त्यांना ओळखतो. त्यांच्या  'डी मार्ट'च्या समभागाने शेअर बाजारात पदार्पण करताच पहिल्या दिवशीच अनेक गुंतवणूकदाराना लखपती केले होते. कारण 'डी मार्ट'चा समभाग पहिल्याच दिवशी तिप्पटीने वाढला होता. फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत दमानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९८ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

    दमानी यांनी अत्यंत कमी कालावधीत शेअर बाजारात आपली ओळख निर्माण केली. दमानी यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी संपादन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी झाले. त्यांना पहिल्यापासूनच अकाऊंटींग विषयात विशेष रस होता.अत्यंत कमी शिक्षण असूनदेखील दमानी यांनी उद्योगधंद्यात अनेक शिखरे पादाक्रांत केली. दमानी यांच्या मते कुठल्याही पदवीपेक्षा नवीन विचार आणि नाविन्यपूर्ण संकल्पना यांनाच विशेष महत्व आहे. कारण अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या जोरावरच आपण आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॉल बेअरिंगच्या व्यवसायापासून केली. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दमानी यांनी त्यांच्या भावाच्या सल्ल्याने इच्छा नसताना स्टोक ब्रोकिंग व्यवसायास सुरुवात केली. तोपर्यंत त्यांना शेअर बाजाराबद्दल काहीही माहिती नव्हती. चंद्रकांत संपत या गुंतवणूकदाराकडून प्रेरणा घेऊन शेअर बाजार समजून घेतला आणि त्यांचा शेअर बाजारातील प्रवास सुरु झाला.

    पहिल्यांदा इतर गुंतवणूकदारांप्रमाणे त्यांच्या पदरी अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही, प्रत्येक अपयशातून शिकत त्यांनी आपली वाटचाल सुरूच ठेवली. सातत्याने केलेल्या गुंतवणुकीनंतर मात्र दमानी यांना यश मिळू लागले. राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफ़ोलिओमध्ये व्हीएसटी कंपनीचे २९.९५ टक्के समभाग आहेत. या कंपनीची मार्केट वैल्यू तब्बल ६८२ करोड रुपये इतकी आहे. दमानी यांच्याजवळ सुंदरम फायनान्स कंपनीचे २.३७ टक्के इतकी हिस्सेदारी आहे. ३एम इंडियामध्ये १.४८ टक्के समभाग दमानी यांच्याकडेच असून त्या समभागांची १८७ कोटी रुपये मार्केट वैल्यू  आहे.  

    राधाकिशन दमानी यांच्याकडे इंडिया सिमेंट कंपनीचे ५५ कोटी रुपयांचे १.९९ टक्के समभाग आहेत. स्टर्लिंग हॉलिडेमध्ये २.०१ टक्के समभाग असून त्याची एकूण किमत होते ४५ कोटी रुपये. गती या लॉजिस्टिक कंपनीमध्ये दमानी यांचा १.८१ टक्के हिस्सा असून त्यांची किमत होते २६ कोटी रुपये. त्यांच्याकडे टीव्ही टुडेचे १.०३ टक्के समभाग असून त्याची किमत २० करोड रुपये होते. राधाकिशन दमानी यांनी आपल्या गुंतवणूक कौशल्यातून सर्वांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांचे ही कुठलाही शेअर खरेदी करताना एक पक्कं धोरण असत, ते म्हणजे 'pick right and hold tight' म्हणजेच योग्य ते निवडा आणि ते घट्ट पकडून ठेवा.
(Published On 28/03/2020)

News-In-Focus