'इकोफ्रेंडली' आणि वेगळ्या वाटेवरची... अहिंसा सिल्क

'इकोफ्रेंडली' आणि वेगळ्या वाटेवरची... अहिंसा सिल्क
    चामड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरू नयेत, यासाठी जगभर फार मोठी जनजागृती चळवळ सुरु असल्याचे दिसते. चामड्याच्या वापरामुळे प्राण्यांची आहुती दिली जाते आणि ही गोष्ट मानवतेच्या दृष्टीने योग्य  नाही, अशी रास्त भूमिका घेऊन आज हजारो लोक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. परंतु आजपर्यंत सिल्कबाबत अशी कोणी मागणी केलेली आढळत नाही, कारण सिल्क म्हणजेच रेशमी धागे बनवण्यासाठीही हजारो किड्यांचा वापर केला जातो. पण तरीही सिल्कच्या वापराबाबत अद्याप कोणीही निषेधाची भाषा केली नव्हती. हैदराबादमधील एका तरुणाला मात्र किड्यांचा जीव घेऊन सिल्क निर्मिती करणे पटत नव्हते. हजारो किड्यांचा जीव घेऊन रेशीम धाग्यांची निर्मिती करण्याएवजी रेशीम निर्मितीसाठी दुसरा काही पर्याय आहे का ? याचा शोध तो तरुण घेऊ लागला. साहजिकच सुरुवातीला त्याला सर्वांनी वेड्यात काढले, पण त्याने किड्यांचा जीव घेण्याशिवाय सिल्क निर्मिती करण्याचे वेड सोडले नाही. काही महिन्याच्या खडतर परिश्रमानंतर त्याने  किड्यांना कुठलेही नुकसान न होता सिल्क निर्मिती करण्याची प्रक्रिया शोधून काढली. 'इकोफ्रेंडली' आणि वेगळ्या वाटेवरची सिल्क निर्मिती करून कुशमा राजा या तरुणाने सिल्क उत्पादनाला अगदी साजेसे नाव दिले ते म्हणजे 'अहिंसा सिल्क'. 

    रेशीम धागे निर्मितीच्या पारंपरिक प्रक्रियेमध्ये रेशीम किड्यांचा कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात आणि त्यापासून रेशीम धाग्यांची निर्मिती केली जाते. या प्रक्रियेत हजारो किडे मरतात. कुशमा राजा यांनी शोधून काढलेल्या प्रक्रियेत मात्र किड्यांना कसलीही इजा होत नाही. कोशातून किडा बाहेर आल्यानंतर ते कोशातून रेशीम धागा काढतात आणि त्याचा वापर कापड निर्मितीसाठी होतो. कुशमा राजा आंध्र प्रदेशमध्ये हँडलूम विभागात नोकरीला असताना त्यांना १९९२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या पत्नी जानकी यांनी  हँडलूम विभागाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी राजा यांना विचारलं होत कि, तुमच्याकडे अशी कुठली रेशीमची साडी आहे का, ज्यामध्ये रेशीम किड्यांना मारून बनवली नसेल. तेंव्हा राजा यांच्याकडे 'नाही' असेच उत्तर होते. मात्र या आपल्याच उत्तराने राजा यांना निरुत्तर केल होत. विना किड्यांना नुकसान पोहचवता खरचं सिल्क साडी बनवता येऊ शकेल का? या प्रश्नाने त्यांच्या मनात रुंजी घातली आणि त्यातूनच त्यांनी किड्यांना कसलीही हानी न पोहचवता सिल्क निर्मिती करण्याचा चंग बांधला. 

    राजा यांच्या या नाविन्यपूर्ण शोधाने रेशीम उद्योगाच्या दुनियेत क्रांती केली. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून कुशमा राजा यांनी या नवनिर्मित रेशीम उत्पादनाला 'अहिंसा सिल्क' असे नाव दिले. विशेष म्हणजे या र्शीम उत्पादनाचे राजा यांनी पेटंट ही घेतले आहे. राजा यांनी निर्मिती केलेलं सिल्क हे सर्वसामान्य सिल्कप्रमाणे चमकदार असत नाही, पण या रेशिमपासून बनविलेले कपडे मुलायम आणि अत्यंत आरामदायी असे असतात. त्यामुळेच अत्यंत अल्पावधीत 'अहिंसा सिल्क' हा ब्रांड जगभर पोहचला. भारतातील अनेक आदिवासी जमाती राजा यांनी शोध लावलेल्या पद्धतीने रेशीम उत्पादन करत आहेत. राजा यांच्यामुळे आदिवासी लोकांना रोजगाराचे नवे साधन प्राप्त करून दिले. 
(Published On 22/02/2020)

News-In-Focus