अमेरीका रिटर्न शास्त्रज्ञ बनला मेंढपाळ

अमेरीका रिटर्न शास्त्रज्ञ बनला मेंढपाळ
    पला मुलगा किंवा मुलगी चांगले शिकले, शिकून नोकरी लागी तर कुठल्याही पालकांना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही आणि जर का एखादा मुलगा अमेरिकेसारख्या देशात नोकरी करत असेल तर त्याच्या पालकांना आभाळ ही ठेंगणे पडल्याशिवाय राहत नाही. पण जर समजा एखाद्या माता- पित्याचा मुलगा अमेरिकेतील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून जर गावाकडे आला आणि तो जर शेळी- मेंढी पाळू लागला तर साहजिकच त्याच्या पालकांना अतीव दुख झाल्याशिवाय राहणार नाही, पण डॉ. अभिषेक भराड यांची गोष्ट मात्र यापेक्षा नक्कीच वेगळी आणि प्रेरणादायी अशीच आहे. 

    अभिषेक अमेरिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत होते. ते त्यांचे आयुष्य अगदी ऐशोआरामात जगत होते.  असे असूनही त्यांना काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होत, त्या जगण्यात त्यांना काहीतरी रितेपणा जाणवत होता. त्यामुळेच त्यांनी ती नोकरी सोडून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा या आपल्या गावी शेळीपालन व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या निर्णयाचा गावकऱ्यांसाठी धक्कादायक असाच होता. पण त्यांनी कोणाचीही परवा केली नाही. अभिषेक यांनी अकोला कृषि विद्यापीठातून बी.एस्सी.ची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या लुसियाना विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली होती. त्यांचे वडील राज्याच्या पाटबंधारे विभागात अभियंता होते. त्यांचीही सर्वसामान्य पालकांप्रमाणे अशी इच्छा होती कि, अभिषेक याने खूप खूप शिकावं आणि अमेरिकेत नोकरी करावी.  

    वडिलांच्या इच्छेनुसार अभिषेक अमेरिकेला गेले. तेथे डॉक्टरेट पदवी प्राप्त करून चांगल्या पगाराची नोकरीही मिळवली. पण इतकी चांगली नोकरी असूनही त्यांचे मन काही अमेरिकेत रमले नाही. दोन वर्षातच त्यांनी मायभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. 

    भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या साखरखेर्डा या गावी शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याजवळ १२० शेळ्या होत्या. या व्यवसायासाठी त्यांनी प्रारंभी १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यासाठी त्यांनी थोडी शेती भाडेपट्ट्याने घेतली. बघता बघता शेळ्यांची संख्या दुप्पट झाली. अभिषेक स्वतः शेळीपालन करतात. शेळ्यांची निगा, त्यांचा खुराक याचे तेच नियोजन करतात.शेळ्यांच्या स्वच्छतेबरोबरच त्यांचे वर्षातून तीनवेळा लसीकरण केले जाते. शेळ्या जास्तीत जास्त पाणी प्याव्यात म्हणून त्यामध्ये गुळाचा वापर केला जातो. 

    अभिषेक यांना सध्या शेळीपालनातून वर्षाला १० लाख रुपयांचे उत्त्पन्न मिळते. त्यातील सात लाख रुपये देखभालीसाठी खर्च होतात आणि त्यांना तीन लाख रुपये थेट फायदा उरतो. अभिषेक यांना यापुढील काळात फायदा आणखीन वाढण्याची अपेक्षा आहे. अभिषेक यांच्याजवळ विविध प्रकारच्या आठ जातींच्या शेळ्या आहेत. त्यामध्ये आफ्रिकन बोर, जमनापरी, सिरोही या जातीच्या शेळ्यांचा समावेश आहे. शेळीपालन व्यवसायाबरोबरच अभिषेक इतरानाही शेळीपालन व्यवसायाचे प्रशिक्षण देतात. डॉ. अभिषेक यांचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी बनले आहे. 
(Published On 04/04/2020)

News-In-Focus