सुजय आणि सुबोध म्हणजेच लंडनचे 'वडेवाले'

सुजय आणि सुबोध म्हणजेच लंडनचे 'वडेवाले'
     ००७ मधील जागतिक महामंदीने जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती. त्यावेळी मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याही प्रचंड आर्थिक आरिष्टात सापडल्या होत्या. अनेक तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बघता बघता जगभर हजारो तरुण बेरोजगार झाले होते. त्यावेळी लंडनमध्ये राहणाऱ्या मुंबईच्या सुजय सोहनी या तरुणाला ही आपली भरभक्कम पगाराची नोकरी गमवावी लागली. आता सुजय समोर मुंबईला परतण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. अशा कठीण परिस्थितीचा ही सुजयने अगदी निर्धाराने मुकाबला करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी चक्क लंडनमध्ये वडापावचा व्यवसाय थाटला. इतकच नव्हे तर बघता बघता त्यांच्या वडापावची भुरळ सर्वांनाच पडली. सध्या सुजय यांना लंडनमधील एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जाते. 

     तत्पूर्वी सुजय हे लंडनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फूड आणि ब्रेवरीज विभागाचे व्यवस्थापक म्हणून काम पहात होते. २००९ मध्ये त्यांची नोकरी गेली आणि अक्षरशः ते रस्त्यावर आले. आता करायचं तरी काय? या चिंतेने त्यांना ग्रासले होते. त्यांची झोप उडाली होती. त्यांनी याबाबतची सारी हकीकत मुंबईतील आपला जिवलग मित्र सुबोध जोशी याला सांगितली. सुबोध आणि सुजय हे दोघेही मुंबईच्या रिझवी कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. तेथेच त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री झाली. सुबोधने सुजयची  हकीकत ऐकल्यानंतर दोघांनीही लंडनमध्ये वडापावचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि लगोलग सुबोध ही लंडनला गेला. लंडनमध्ये दोघांनी व्यवसायासाठी जागा शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. 

     वडापावच्या व्यवसायासाठी जागा शोधत असताना ते दोघे एका आईसक्रिम पार्लर चालविणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आले. या दोघांनी त्याला वडापाव साठी जागा देण्यासाठी गळ घातली. आईसक्रिम पार्लरचा मालक जागा देण्यासाठी तयार झाला, मात्र त्याने त्यासाठी भरभक्कम भाडे  (२१० मध्ये जवळपास ३५ हजार रुपये दरमहा) आकारले.सुजय आणि सुबोध यांच्यासमोर दुसरा अन्य कुठला पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी आईसक्रिम पार्लरचा मालकाणे सांगितलेला पर्याय स्विकारला. त्यांनी आईसक्रिम पार्लरमधून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांनी वडापाव आणि दाबेली हे दोन पदार्थ विकण्यास प्रारंभ केला. पिझ्झा आणि बर्गर खाणाऱ्या लंडनमधील लोकांना वडापावची चव कळावी यासही त्यांनी पहिले काही दिवस मोफत वडापाव दिला. त्यानंतर लोकांना हळूहळू वडापावची चव आवडू लागली आणि त्यांचा व्यवसाय वाढू लागला. अगदी काही दिवसातच त्यांनी लंडनमधील प्रसिद्ध अशा ह्न्स्लो हाय स्ट्रीट या ठिकाणी प्रशस्त जागेत १५ ऑगस्ट २०१० रोजी त्यांनी श्री कृष्ण वडापावची मुहूर्तमेढ रोवली. 

     सुजय आणि सुबोध हे आपल्या दोन शाखा अत्यंत यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांना खवैयांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून सुरुवातीला केवळ वडापाव आणि दाबेली या दोन पदार्थांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता खूपच वाढला आहे. वडापाव आणि दाबेली बरोबरच ते आता ६० प्रकारचे मुंबईचे स्ट्रीट फूड ग्राहकांना पुरवत आहेत. त्यामध्ये मिसळ, पाणीपुरी, रगडा, कचोरी, सामोसा अशा विविध पदार्थांचा समावेश आहे. त्यांच्याकडे पोहे आणि साबुदाणा खिचडीही मिळते. आता श्री कृष्ण वडापावची वार्षिक उलाढाल तब्बल ५ लाख पौंड अर्थात ४.४ कोटींची झाली आहे. ९ वर्षांच्या अखंड मेहनतीने त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुजय आणि सुबोध यांनी दाखवून दिल कि, मंदी असो वा नसो कष्ट केल्यास तुम्हाला येश हे हमखास मिळतेच.
(Published On 21/03/2020)

News-In-Focus