विमानाला 'मेक इन महाराष्ट्र'चा टच देणारा अवलिया

विमानाला 'मेक इन महाराष्ट्र'चा टच देणारा अवलिया
     साधारणपणे तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एक तरुण अचानक प्रकाशझोतात आला...त्याला कारण ही तसचं होत...त्याने आकाशात उंचच उंच झेप घेण्याचे स्वप्न बघितले होते...ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सतत धडपडत होता...त्याच्या धडपडीसमोर नियतिलाही झुकावे लागले...आणि घराच्या टेरेसवर विमान तयार करण्याच्या सुरु झालेल्या त्याच्या प्रवासाला मुंबईतील 'मेक इन इंडिया' प्रदर्शनात सरकारी मदतीचे बळ मिळाले. महाराष्ट्र सरकारने त्या तरुणाला २० प्रवासी क्षमतेच विमान बनविण्याची परवानगी दिली. इतकेच नव्हे तर त्याला पालघर मध्ये जमीनही उपलब्ध करून दिली....असा विमान निर्मितीचा ध्यास घेतलेल्या पण तरीही जमिनीवर पाय असणाऱ्या अवलिया तरुणाचे नाव आहे कॅ. अमोल यादव. महाराष्ट्र सरकारने कॅ. यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रा. लि. कंपनी बरोबर छोटे विमान निर्मितीचा आणि पालघरला विमान निर्मितीचे केंद्र बनविण्याबाबत सामंजस्य करार ही केला. या योजनेसाठी जवळपास ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यासाठी सरकार सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुढे आले आहे. 

     कॅ. अमोल यांचे विमान बनविण्याचे स्वप्न सहजासहजी पूर्ण झाले, असे बिल्कुल नाही. यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. कॅ. अमोल व्यवसायाने पायलट असून गेल्या १७ वर्षापासून ते स्वतः विमान बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करीत आहेत. अमोल वयाच्या १९ व्या वर्षी व्यावसायिक पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते. त्या प्रशिक्षणामुळे अमोल यांना आत्मविश्वास मिळाला कि आपणही नक्कीच विमान बनवू शकतो. भारतात परतल्यानंतर अमोल यांनी विमान निर्मिती करण्याचे ध्येय उराशी बाळगून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अमोल यांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी त्यांचे वडील शिवाजी यादव यांनी त्यांना पूर्ण पाठबळ दिले. ज्यावेळी अमोल यांनी आपल्या स्वप्नाबाबत घरच्यांना कल्पना दिली, त्यावेळी घरातील सर्व मंडळी त्यांच्यामागे ठाम उभी राहिली. त्यामुळे अमोल यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. 

     १९९८ मध्ये अमोल यांनी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला आणि काही दिवसातच त्यांची दोन प्रवासी क्षमतेचे विमान तयार केले. परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते विमान कधीच उडू शकले नाही. पण यामुळे अमोल निराश झाले नाहीत, त्यांनी १९९९ ला पुन्हा विमान निर्मितीच्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करून पुन्हा कामाला लागले. अथक परिश्रमानंतर २००३ मध्ये त्यांनी दोन प्रवासी क्षमतेचे विमान तयार केले, परंतु हवाई उड्डाणाबाबतीत असणाऱ्या कडक नियमांमुळे ते विमान पुन्हा एकदा आकाष्ट उडण्याऐवजी जमिनीवरच राहिले. इतके अपयश येऊनही अमोल यांनी जिद्द सोडली नाही आणि त्यातूनच २०१० मध्ये एअरक्राफ्ट टीएसी ००३ या संकल्पनेन जन्म घेतला. 

     २०१६ पर्यंत प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्टाच्या बळावर कॅ. अमोल यांनी सहा आसनी विमानाची निर्मिती केली. त्यावेळी ते जेट एअरवेज सोबत काम करत होते. हे विमान त्यांनी 'मेक इन इंडिया' प्रदर्शनात लोकांसमोर आणले आणि त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अगदी काही क्षणात अमोल यांची ख्याती देशातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहचली. माध्यमांनीही त्यांची दखल घेतली. परंतु या विमानाला डीजीसीएकडून अधिकृत परवाना मिळालाच नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अमोल यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि परवान्याचा हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांनीही यामध्ये वैयक्तिक लक्ष घातल्यानंतर कॅ. अमोल यांना  डीजीसीएकडून अधिकृत परवाना मिळाला. आता महाराष्ट्र सरकारने कॅ. अमोल यांच्याशी करार केला असून त्यांच्या विमान निर्मिती कंपनीसाठी पालघरमध्ये तब्बल १५५ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. आता लवकरच आपल्याला आकाशात 'मेक इन महाराष्ट्र' विमान उंचच उंच भरारी घेताना नक्कीच पाहायला मिळेल, यात शंका नाही.
(Published On 07/03/2020)

News-In-Focus