रितू जयस्वाल... सरपंच असावा तर असा

रितू जयस्वाल... सरपंच असावा तर असा
     रपंच हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या नजरेसमोर 'टिपिकल' छबी येते. सरपंच म्हणजे वयाने वृद्ध झालेले...सरपंच म्हणजे अशिक्षित किंवा कमी शिकेलेले...सरपंच म्हणजे पारंपरिक राजकारणी...पण आता गावोगावी हे चित्र बदलत आहे. तरुण ही आता मोठ्या संख्येने ग्रामीण भागाच्या विकासासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. त्यात उच्च शिक्षित, परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सरपंच पद भूषविणारी अनेक मंडळी गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरसावली आहेत. त्यामध्ये अगदी वरच्या क्रमांकावर नाव येते ते रितू जयस्वाल या रणरागिणीचे.बिहारसारख्या मागास राज्यातील एका खेडेगावाचे भविष्य बदलण्यासाठी अरुण कुमार नावाच्या आयएएस अधिकाऱ्याची पत्नी रितू जयस्वाल यांनी वर्तमानात स्वतःला विकासासाठी झोकून दिले आहे. पती आयएएस

 अधिकारी असल्याने रितू जयस्वाल यांच्या पायाशी सगळ्या सुखसोयी लोळण घेत होत्या. पण त्यांनी सुख उपभोगण्यापेक्षा बिहारमधील सिंहवाहिनी या मुलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर असलेल्या गावाचा कायापालट करण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.

     रितू जयस्वाल यांचा जन्म बिहारमधील वैशाली येथे झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती. शाळेपासून कॉलेजपर्यंत ज्या-ज्या वेळी संधी मिळेल, त्यावेळी त्यांनी समाजसेवेला प्राधान्य दिले. विशेषतः त्यांनी निराधार महिलांना आधार देण्याचे काम केले. त्यांनी समाजसेवेबरोबरच अर्थशास्त्र विषयातून पदवी संपादन केली. १९९६ मध्ये त्यांचा आयएएस अधिकारी अरुणकुमार यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर रितू सीतामढी जिल्ह्यातील सोनबरशा या आपल्या सासरच्या मूळ गावी आल्या होत्या. गावात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण ते गाव मुलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर होते. सर्वत्र दारिद्र्य आणि अशिक्षितताच होती. गावात ना लाईट होती ना रस्ते. गावची ही स्थिती बघून त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. 

     अंधकारात चाचपडत असलेल्या गावांसाठी आपण काहीतरी करायला हवे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी त्यासाठी आपले अलिशान राहणीमान सोडून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सिंहवाहिनी गावात आपले कार्य सुरु केले. सिंहवाहिनी गावाची स्थिती पण बिहारमधील इतर गावांपेक्षा वेगळी नव्हती. गावात पाणी, रस्ते, वीज यापैकी कशाचीही सोय नव्हती. त्यांनी सर्वात प्रथम गावातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेतला. कारण कुठल्याही प्रगतीचा पहिला टप्पा हा शिक्षण असतो, हे त्यांना चांगलेच माहित होते. संपूर्ण गावात केवळ एकाच मुलीने बी.एड. केले होते आणि ती बोकारी शहरात शिक्षक म्हणून काम करत होती. रितू यांनी त्या मुलीला आपल्या स्वतःच्या खिशातून शहरात मिळतात, त्यापेक्षा जादा पैसे देण्याची हमी देऊन गावी बोलावून घेतले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडून घरी बसलेल्या २५ मुलीना त्यांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले. या २५ मुलींपैकी १२ मुलींनी २०१५ मध्ये दहावीची परीक्षा दिली. त्यावेळी खर्या अर्थाने रितू यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसू लागले. 

     शिक्षणाबरोबरच रितू यांनी स्त्रीभ्रूणहत्या, स्वच्छता, सेंद्रिय शेती अशा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी त्यांना समजले कि सिंहवाहिनी गावासाठी विद्युत जोडणी मंजूर झाली आहे, पण निधी अभावी त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यानंतर त्यांनी सर्व गावकऱ्यांना एकत्रित राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनावर दबाव आणला, त्यामुळे त्यांच्या गावात लाईट आली. सिंहवाहिनी गावच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण होता. रितू जयस्वाल यांच्या चळवळीला आता राज्यभरातून पाठबळ मिळू लागले होते. 

     २०१६ मध्ये रितू जयस्वाल यांना सिंहवाहिनीच्या ग्रामस्थांनी सरपंच पदाची निवडणूक लढवण्याची विनंती केली. रितू यांना राजकारणात अजिबात रस नव्हता, पण ग्रामस्थांच्या आग्रहामुळे त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल ७२ टक्के मतदान घेऊन सिंहवाहिनीच्या सरपंच झाल्या. सरपंच झाल्यानंतर रितू यांनी सिंहवाहिनी गावात तब्बल २००० शौचालये उभारली. महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरु केले. सेंद्रीय शेतीची चळवळ आणखी व्यापक केली. रितू यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना २०१६ मध्ये 'आदर्श सरपंच' पुरस्काराने सन्मान केला. असा पुरस्कार मिळवणाऱ्या रितू या बिहारमधील एकमेव सरपंच आहेत. रितू जयस्वाल यांच्या या कार्याला 'द स्टॉक'चा सलाम.
(Published On 15/02/2020)

News-In-Focus